पैली अंघोळ

 पेैली अंघोळ!!


इयत्ता सातवी.पहिली सत्र संपली. आता दिवाळीची सुटी लागणार म्हणून दिनू खूष होता. दिवाळीत गोड धोड मिळणार नवीन कपडे फटाके या कल्पनेतच तो रमत होता. 

आईला दिवाळीला नवीन कपडे कधी घ्यायचे म्हणून तो विचारु लागला. " आणतील रं त्येनी नगं काळजी करुस " आई म्हणायची. 

"आयं मला फुल पॅंट पाहिजे दादा(वडील)मला सारखं खाकी चड्डी पांढरा शर्टच आणत्यात."दिनू सांगतो.


"बरं बरं तीबी नवीनच असत्यात न्हवं" आई म्हनते.

"मग घालायची कवा?" दिन्या


"पैल्या आंगुळीला" बेस्तरवारी (गुरुवारी)आई.

दिन्या पुन्हा खुष व्हायचा.

बघता बघता दिवाळी उद्यावर आली. फक्त आजची रात्र मग उद्या मज्जा म्हणत दिनू झोपी गेला.

सकाळ झालीय.सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतोय.शेजारी रांगोळी काढत आहेत. उंबरठयावर दिवे दिसत आहेत. दिनूच्याही अंगावर नवीन कपडे आहेत.

त्याची आवडती फुल पॅंट घालून तो मिरवत आहे.

दिनूही एक फटाका लावतो ध डा् म्म असा आवाज होतो.

अन् दिनूचे स्वप्न तुटते. तांबडं फुटायला वेळ होता.

"मालक ओ मालक" म्हणत कुणीतरी आवाज देत होतं"

आई बाहेर जाते . एकजण कागदाचं चिटोरं दाखवत म्हणतो."

तोड आलीय ऊसावर पडस्कीत फड दाखवायला छला कुणीतर"


दिनूचं वडील शेतातच असतात. आई दिनूस म्हणते 

" बाळा जारं आपलं पडस्कीतलं उसाचं रान दाखीव जा"

दिनू डोळे चोळत नाखूषीनचं विचारतो.

आयं पैली आंगुळ?

आई म्हणते " पाणी तापतंय तवर माघारी आल्यावर कर ".

दिनू "बरं "म्हणतो . 

आई एक नारळ हातात देते.

व ऊस तोडण्यापूर्वी फोडायला सांगते.

दिनू ऊसतोडकर्‍यांना फड दाखवायला तो निघतो.

काही वेळातच ते तिथं पोहोचतात. 

नारळ फुटतो . ऊसावर कोयते पडू लागतात. 

एक घाव मुळावर ऊस हातात घेऊन कोयत्यानेच सरसर पाचट काढून खाट्करुन हिरवंगार वाढे ऊसापासून वेगळं होऊ लागलं.

रसरशीत ऊस बघून दिनू पारोसाच ऊस चघळू लागतो.

"दिनू ऐ दिनू तू थांब फडावर मी अालोच" दिनूच्या वडीलांचा आवाज येतो.

दिनुला थांबण्याशिवाय पर्याय नसतो. मनात त्याला दिवाळीच्या कपड्यांची आठवण येते. तसंपण खाकी चड्डी अन पांढरा शर्टच असणार.म्हणून तो विचार झटकून टाकतो.

दिनूचे बाबा घरी येतात . आई त्यांना काहीतरी सांगून,पाटी डोक्यावर घेऊन शेताकडे रवाना होते.

इकडं दिनू फडातच असतो. तोडकर्‍यांनी एव्हाणा निम्याहून जास्त फड रिकामा केला होता. त्यांच्या बायकांनी मोळ्या बांधायला सुरुवात केली होती.

दिनूची आईही जेवण घेऊन रानात पोहोचली.

दिनू म्हणाला आई मी जाऊ घरी? 

थांब आता जेवण आणलंय जेव आधी"

दिनू जेवण तिथंच झाडाखाली जेवायला बसतो.

आई फडातून ऊसाचं वाढं गोळा करत असते.

आज रानात बसून जेवताना त्याला वेगळाच आनंद लाभतो. एवढ्यात दुरुन ट्रॅक्टरचा आवाज येतो.

ड्रायव्हर मुकादमाला आवाज देत वाहन भरायला सांगतो.

वाहन भरायला सुरूवातही होते. ट्रेलरच्या बाजून पडणार्या कांडया गोळा करुन आत ट्रेलरमधे टाकत असते. दिनूही तिला मदत करत असतो. कुठुनतरी बाबांचा आवाज येतो ते पडलेले ऊस पुन्हा मोळ्यात खुपसत होते. मुकादमाचे दोन गडी सुबकरित्या गाडी भरत होते. खच्चून बांधलेला ऊस भरुन गाडी निघायला तयार झाली.अजून निम्मा फड ऊभा होता. ट्रॅक्टर गाडी भरुन सडकंवर (रस्त्यांवर)काढायची म्हणून ड्रायव्हर ची धांदल सुरु होती. कशीबशी फडातून गाडी बाहेर निघाली.

दिनूचे वडील सूचना करत व काही गडी ट्रॅक्टर गाडीमागून निघाले होते.

आता पाणंद रस्ता ओलांडला की मग काळजी मिटली.

डायवर अंदाज घेत घेत पुढं निघाला ट्रॅक्टर च मुंडक अोरडत होतं. पांदीच्या दलदलीतून निघत निघत मागून सगळे चालले होते . थोडसं अंतर पार करुन सडकेवर निघणारच. एवढ्यात ऊस भरलेला ट्रेलर दलदलीत रुतत गेला. अन माणसांचा आवाज आला . "हो हो हो "म्हणत ट्रेलर उजव्या बाजूला पलटला. ट्रॅक्टरचं मुंडकं व ट्रेलरला.पीळ बसला.ड्रायव्हरनं कशीबशी उडी टाकली.

तोडकर्‍यांचा घोळका जमला. लांबून दिनूही पळत आला. आई गर्दीत पोहोचते दिनू दिसतो. पडलेला ट्ॅक्टर ट्रेलर व पसरलेला ऊस बघून त्याच मन हिरमुसतं . आईपण झटझट पावलं उचलून आली . .

पण पण . . . घरधनी धनी कुठं दिसना ती कासावीस होऊन दिनूला मोठ्यानं आवाज देते.

"दिनू ऐ आरं त्येनी कुठं दिसनात" गर्दीत बघत

"ऐ आरं माजं कारभारी कुठं दिसनातं" म्हणुन किंचाळते.

ड्रायव्हर व मुकादम भानावर येतात.

गड्यांना आवाज देतात.

"ऐ ऐ ऊस बाजूला करा बाजूला करा ऊस "

कणाकणा सगळे गडी ऊसाच्या मोळ्या कांड्या फेकू लागतात. दिनुच्या आईची नजर सैरभैर होते.साधारण दहाबारा मिनीटात ऊसाच्या ढिगार्‍यांखाली व ट्रेलरच्या खाली दडपलेला एक निपचीत पडलेला निष्प्राण देह त्या गड्यांनी उचलून काढला. गर्दीला समजायला वेळ गेला नाही. आईनं टाहो फोडला दिनूही कासावीस झाला.

तरीही उशिर नको म्हणून काहींनी गाडीवरुनच सरकारी दवाखाना जवळ केला.पण उपयोग नव्हता.

गावकरी पाव्हणेपै जमले घरात बायामाणसांनी नुसता गोंगाट घातला. 

स्मशानभूमीच्या दिशेने सगळे निघाले. दिनूला काहीजणांनी पुढे घातला. दहणाची तयारी झाली.एकजण म्हणाला ऐ पोराला घ्या फुडं त्याच्या हाताने म्रृतास पाणी पाजतात. अंतत: चितेस अग्नी देतात. चितेचा भडका उडतो. निरागस दिनू झळांपासून स्वता:स वाचवतो.


चिता पेट घेते. गर्दी माघारी निघते. 

एक व्रृध्द दिनूला म्हनतो " ऐ पोरा जा वगळात (ओढ्यात)आंगुळ कर अन् मगच घरात जा"

दिनूला त्याच्या "पैल्या आंगुळीची "आठवण होते.

अंघोळ करुन दिनू घरी जातो. माजघरात शिरतो तोवर खुंटीवर अडकवलेली नवी पिशवी त्याच लक्ष वेधते.

ती उघडण्याचा मोह तो थांबवू शकत नाही. आत चक्क नवी राखाडी रंगाची पॅंट अन् रेषारेषांचा रंगीत शर्ट असतो.

दिनू पिशवी घेऊन आईकडे धावतो . आईला कपडे दाखवतो. आई पुनश्च हुमसुन रडू लागते.अन् सकाळपासून थांबवलेल्य‍ा दिनूच्या अश्रूंचा बांध फुटतो . . ". दादा . . . . म्हणत धाय मोकलून " आईच्या कुशीत रडू लागतो . . . . 


(c) सुविकोळेकर


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६