एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६
एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६
आमच्या इयत्ता आठवीचा काळ म्हणजे १९९६ असावे. आम्ही स्काऊट चे विद्यार्थी होतो. तेव्हा एक भन्नाट गोष्ट घडली.आमच्या शाऴेने आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड यांचा निवासी कॅंप तिन दिवस ठेवला होता.
म्हनजे तिन दिवस शाळा नाही फक्त कॅंप व निसर्ग निवास!!
तालुकास्तरीय कॅंप असल्याकारणाने अडूऴ ता पाटण येथील क्षेत्रपाल विदयालयाचे देखील विद्यार्थी सहभागी झाले होते. अगदी त्यावेळेसही त्या कॅंपला मुलीदेखील होत्या. अर्थात शाळेविषयी पालकांची विश्वासार्हताही तेवढी द्दढ होती.
आजकाल जे समर कॅंप किंवा हिवाळी शिबिरं होतात त्याचा आद्यप्रकारच म्हणा! !
आमचे दोन संघ एकत्र केले होते वनराज व गजराज संघ.
प्रमोद , पवन ,उमेश, प्रशांत , किशोर , सतिश, रुपेश असे बरेच मित्र आमच्या संघात होते.
शाळाच निसर्गाच्या सानिध्यात असल्याने रात्री अपरात्री थोडीशी भिती असेलही पण उत्साहाच्या पुढे भिती कोमेजुन गेली होती. तेव्हा बिबट्या वगैरेची भिती नसायची. साधारण टिपिकल त्रिकोणी तंबू उभारायचा त्यावेळी बैल गाठ, सूकर गाठ अशा गाठी स्काऊटमधे शिकवल्या जात त्याचा उपयोग तंबू उभारताना होत असे.
त्यात आपले सामानसुमान ठेवायचे आणि दिवसभर इतरत्र थांबायचे रात्री तंबूत झोपायचे.पहिल्या दिवशी घरुन आणलेले जेवन दोन्हीं वेळ पुरवुन खाल्ले. जानेवारीचे दिवस असावे . थंडी होतीच. मात्र एकमेकाला बिलगुन पांघरुनात पहुडलेली लेकरं बघून थंडी "शिथील" होत मायेची ऊब फिरवून निघून जायची.
रात्रभर गस्त घालायला नववी व दहावीची मुलं असायची.
ती प्रत्येक तंबूसमोर काठी वाजवत जागते रहो म्हणत ओरडून जायचे. आमच्यातून कोणतरी त्याला प्रतिसाद द्यायचा
" ऐ जा झोप जा अंगावर घेऊन" यावर
(अाम्ही अंधारात खदा खदा खुसपुसायचो.)
तो गस्तवाला म्हणायचा.
"कारं मस्ती आल्या व्हय"?
पुन्हा हळूच कोणतरी बोलणार
"कुणाला तुला व्हय?"
मग तो पुन्हा दरडावायचा
"तू सकाळ घाव (भेट) तुझी मस्तीच जिरवतो"
सकाळी मात्र आम्ही तो मी नव्हेच अशा अविर्भावात फिरायचो.
तिथला दिनक्रम मस्त असायचा. सकाळी कवायत प्रकार. थोडावेळ सुट्टी. नंतर मात्र सर्व विद्यार्थांना एकत्र बोलावून स्काऊटचे काही विषय सांगून संचलन घेतले जात असे.
"बेडन पावेल तेरे बंदे हम मानेंगे तेरे हर नियम"
किंवा
"भारत स्काऊट गाइड झंडा उंचा सदा रहेगा "
अशी गाणी म्हणून घेत.
इथे एक भारी होतं आपला शिधा आपणच शिजवायचा. पावट्याची आमटी हा जगातला सर्वोत्तम प्रकार आम्ही करायचो. जमतील तशा चपात्या व भात. पाटील सर तर काळजीपोटी प्रत्येक संघांकडे एखादी दहावीची भगिनी चपाती करायला घेऊन येत. हा कॅंप म्हनजे स्वावलंबाचा धडाच जणू!आणि विद्यार्थीसुध्दा सरांना आपण बनवलेल्या जेवणाचे ताट नेऊन देत.
एकदा रात्री तंबूत उजेडासाठी एक मेणबत्ती लावली ती किशोरच्या सुटकेसवर ,ती पाघळत पाघळत अाली ती सुटकेस उष्णतेने वितळली आणि किशोर मात्र " आता माझी सटकली " या आवेशात मला ' खाऊ का गिळू'करु लागला. रात्री शेकोटीचा कार्यक्रम असायचा तिथं विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम व्हायचे तिथं आपलयाकडील सुप्त गुणांचा शोध लागायचा.कुणाचे सादरीकरण झाले की
"एक दोन तीन"
"एक दोन तीन"
"एक
दोन
तीन"
अशी स्काऊट क्लॅप द्यायचो.
स्काऊट गाईड परिपूर्ण असावा यासाठी
आमचे के.व्ही.पाटील व शिंदे बी.व्ही.सर कटाक्षाने शिस्तबद्घ कार्यक्रम्र राबवायचे. स्वच्छता मोहीम तर ठरलेलीच.कवायत प्रकार करताना चुकला की पाटील सर तर तिथेच गिरिपुष्पाच्या काठीने तंगड्या सोलवटून काढायचे.
सकाळी पहाटे पाचला उठायचे म्हणजे खूपच कठिण कार्यक्रम असायचा. पहाटे थंडीतही
पाटील सर एक गाणं म्हणायचे
बाळ्या घुमव रं घुमवं रं घुमव तुझा पावा ॥
म्हातारं खॉ खॉ करतय रं
तान्हुलं ट्यां ट्यां करतय रं
बाळ्या घुमव रं घुमवं रं घुमव तुझा पावा॥
कशीबशी सकाळ व्हायची आम्ही निसर्गाच्या हाकेला "ओ "द्यायला वनीकरणात निघून जायचो. नंतर नळाखाली आन्हिकं उरकून पुढच्या सत्राला तयार राहायचो.
मस्तच सोनेरी दिवस होते.
ना शाळा ना तास,
ना पुस्तक ना अभ्यास,
एकदम झकास !
त्या तिन दिवसात
इयत्ता दहावीच्या मुलांनी कमवा शिकवा योजनेंतर्गत चहाची टपरी टाकली होती.एकदा मला अमोल नांगरेनी पैसे न घेताच चहा दिला होता.
यावेळेस क्षेत्रपाल विद्यालयाच्या मुलांनी 'धोम' या क्रृष्णा नदीवरील धरणाची प्रतिक्रृती केली होती. कोयनेनंतर मला माहित झालेले दुसरे धरण ! !
तिसर्या दिवशीच्या समारोपाच्या कार्यक्रमात तंबू सजावट तसेच आतील स्वच्छता नीटनीटकेपणा व दोन दिवसात राबवलेल्या उपक्रमाला कसा प्रतिसाद दिला याचे पर्यवेक्षण करायला सरांची टीम आली होती. आम्ही बागेची प्रतिक्रृती तसेच देवीचे मंदिर व मंदिरासमोर तुषारसिंचनाचा देखावा केला होता. सतिश काळेने स्वत: तयार केलेला पुष्पगुच्छ सरांना भेट दिला होता.
एकंदर आमचा संघ वयाने लहान होता पण उत्तेजनार्थ आम्हाला चवथे बक्षीस मिळाले होते.
सर्वांना कॅंप संपूच नये असेच वाटायचे.पण पर्याय नव्हता.
सदर कॅंप घरापासून व कुटुंबियांपासून दूर राहताना ज्या काही गोष्टी अनुभवायच्या असतात शिकायच्या असतात त्याचा वस्तुपाठच घालून गेला.
अजूनही त्याच्या आठवणी अधूनमधून रेंगाळत असतात.
(c)सुविकोळेकर
Comments
Post a Comment