Posts

Showing posts from September, 2023

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग अठरा

 पहाटे पहाटे बाहेर गोठ्याकडे आबांचा व आईचा आवाज येत होता. उठू की नको या द्वंद्वात नितीन तसाच पडून राहिला. थोड्या वेळात पुन्हा जास्तच कुजबुज वाढू लागली.आईचा कातर आवाज येऊ लागला. मग मात्र तो डोळे चोळत उठला.बाहेर तिन चार जणांची गर्दी होती आबा डोक्याला हात लावून बसले होते. आई गोठ्यात हुमसुन रडू लागली होती. नित्याला कारण समजत नव्हते. बारीक भुवया करुन तो आईकडे गेला . त्याने नजरेनेच विचारले." का रडतेस" आईने मग दावणीत लाकडावर मान टाकलेल्या म्हशीकडे पाहिले. ते बघून नितीनला धक्काच बसला. म्हशीचे विस्फारलेले डोळे भेसूर दिसत होते पाय ताणलेले होते तोंडात फेस सद्रृष्य द्रव बाहेर आला होता. त्यांची दुधाची म्हैस अशी मरणासन्न पाहून त्यालाही वाईट वाटलं. हिच्याच दुधाच्या भरोशावर किमान घरखर्च व एस.टी.चा पास तरी निघायचा. पहाट संपली होती बहुधा उजाडलं होतं.आता काही माणसं हातात टमरेल सांभाळत बघत बघत जात होती.काही " जाऊन "आलेली मशेरी घासत तिथंच उभी होती. गर्दी बोलू लागली होती. "वैरणीतनं काय तरी पोटात गेल असंल" कुणीतरी म्हणालं "इच्चूकाटा न्हाय हिथं पर सांगता येत नाही...

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग सतरा

 " अ . घरात कोण हाय का?" नितीन आवाज देतो. एक मध्यमवयीन पोक्त स्त्री घरातून बाहेर येते. दरवाजातूनच विचारते. " काय रं बाळा कोण तू ?काय काम हुतं" स्त्री विचारते. "माझं नाव नितीन इथं कॉलेजला आहे" नितीन दचकत विचारतो. " तुमचं मालक(पती) पुलिस हायती व्हंय?" "होय बर मग" मावशी विचारतात. "एक काम हुतं" नितीन बोलतो. कसलं? मावशी विचारतात. " आवं मावशी तुमच्या मालकांनी आमची गाडी पुलावर पकडलीवती आणि कागदपत्रं घेतल्याती त्यांनी." " नितीन सगळी धरपकडीची कथा कथित करतो मावशीपण बारकाईनं ऐकत असतात. आम्ही दंड पन्नास रुपय भरत हुतो पण ऐकत नाहीत.पण दंडबी लय हाय दीडशे रुपय." तेवढा दंड कमी घ्याला सांगा की तुमच्या मालकास्नी" "कागदपत्रं नाय आणली तर घरी आमची धडगत नाही" त्यो माझा मित्र शंतनु त्याचे बाबा लय कडक हायती " त्यांना माहित नाही यातलं काही. "माझ्या घरात कळंलं तर आमची आय फोडून काढील मला" नित्या शक्य ते बरळत असतो. एवढा वेळ दरवाजातच उभे असतात. त्या मावशी आत बोलावतात. नित्या "नक...

गेट टुगेदर व्हावे नेहमी

 गेट टुगेदर व्हावे नेहमी गेट टुगेदर व्हावे नेहमी एकमेकांसी भेटावे नेहमी आठवणीत त्या 'शाळ'पणाच्या जगत रहावे नेहमी नेहमी "अडचणी"त्या असती नेहमी पिच्छाच त्या पुरवती नेहमी सोडवण्यासी त्यांचा गुंता भेटत रहावे नेहमी नेहमी कुणी म्हणतसे" मिथाच" कल्ला भेटूनी करती हल्लागुल्ला अरे मिथ्याच त्या कल्ल्यासाठी जमत जावे नेहमी नेहमी मला नाही रे वेळच आता मुलबाळं ही झाली आता 'त्यांच्याच'सारखं जगण्यासाठी येत रहावे नेहमी नेहमी कुणास वाटे उपटसुंभ मी रिकामटेकडा अन् 'शुंभ' मी उदासवाणं सोडून जगणं "जिवंत"जगावे नेहमी नेहमी आठवणींचा "पर्जन्य" तो वर्तमानातील वणवा तो त्या वणव्यावर पाणी शिंपूनी भिजत रहावे नेहमी नेहमी भिजत रहावे नेहमी नेहमी सुविकोळेकर