मैत्र जीवांचे# शैलेश मोरे
मैत्र जीवांचे# शैलेश मोरे
तो भेटला तेव्हा पूर्वमाहितीनुसार वलयांकित होता. तो दिसला की बाजूला मित्रांचे अन मैत्रिणींचे कोंडाळे! एमेस्सी ला एकाच डिपार्टमेंटला आमचीओळख झाली.आम्ही मूळातच असेच खुशालचेंडू अन सातारचा म्हटल्यावर विषयच संपला.पण तो काहीना काही गोष्टीत प्रसिद्ध होता. मग त्या चाकोरीबाहेरच्या का असेनात. महाराष्ट्रच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करताना अभी नही तो कभी नही या प्रतिज्ञेवर ठाम.
इकडे एमेस्सी लेक्चरला दांडी पडु लागली मात्र महाशय जे होइल ते बघू म्हणत राहुरीतील झाडांच्या सावलीत रट्टा मारत होते. शैलेश मोरे!!
होय.
कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले. देईल ती परिक्षा पास होत,राजपत्रित अधिकारी म्हणून स्थिरस्थावर झाले. त्यांच्या सोबतच्या बर्याच आठवणी आहेत.एकदा कॉलेजमधे क्रिकेटच्या नाईट मॅचेस होत्या ,आम्ही एकाच संघात होतो.अर्थात तेच कर्णधार होते.मला गोलंदाजीपण द्यायचे." नीट टाक नायतर कानफडीन" म्हणून दमपण द्यायचे. एकदा एका फलंदाजाने उंच चेंडू फटकावला.
आम्ही दोघेपण अंदाज घेत होतो मला समोरुन शैलेश दिसताच मी म्हणालो " (कॅच) तुम्ही घ्या तुम्ही घ्या"
ते लगेच ओरडले "तू घे माकडा तुझा कॅच हाय" कसाबसा तो उंच उडालेला चेंडू शैलेशच्या धाकाने व माझ्यावर दया दाखवून माझ्याच हातात येऊन पडला.
दिवस संपत होते एव्हाना शैलेश PSI झालेच होते.
एम एमेस्सी ची तोंडी परिक्षा बाकी होती. त्यात त्यांची भंबेरी उडाली होती. पण ते अत्यंत खिलाडूपणाने मला सांगत होते "जाऊ दे रे वेळ टळून गेली लय विचार नसतो करायचा"
मला नेहमी 'काळ्या' म्हणून हाक मारायचे.
मी लगेच म्हणायचो तुमचा कुठं लय 'उजेड' पडलाय, यावर ते मला हसत म्ह्मनायचे मी गव्हाळ वर्णाचा आहे .
यावर त्रयस्थ म्हणून प्रमोद जरग यांचे मत घ्यायचो.
तर ते डोळ्याची दीर्घ उघडझाप करत "हूंम्म" असा वेळखाऊ सुस्कारा सोडत किंचित हसून" चा(चहा) जो पाजलं त्यो गोरा"
असा शेरा मारत. शैलेश मग प्रमोदवर तोंडसुख घेत.
राहुरीत असताना मी व राहुल देशपांडें एकदा मसाले दूध विक्रेत्या जवळून जात होतो.
मी म्हणालो " दूध "
राहुल म्हणाला" घेवूया"
यथावकाश दूध घेतले.
अन् मग समजले की दोघांकडेपण पैसे नाहीत.
झाली की पंचाईत.
पण . . . त्या दूधपित्या गर्दीत एक ओळखीचा आवाज आला."
मला दहा हत्तीच बळ वगैरे काही नाही आलं.पण हायसं वाटलं.
मी आवाज दिला
शैलेश! दोन दूध .बिल तेवढं द्या.
शैलेशनी आमची नसलेली "विज्जत" वाचवली.
अन् मघाचपासून थांबवलेला ढेकर देत आम्ही
"अ . . प " करत अभ्यासाला गेलो.
शैलेश सरांची नुकतीच अहिल्यानगरला आमची भेट झाली.
आम्ही जेवायला गेलो सोबत आमचे मित्र व प्रकाशक घनश्याम पाटील होते. शैलेश सर जेवणाआधी बेसिनवर हात धुताना मला म्हणाले.
" जेवल्यावर बिल द्यायची घाई करुन आब्रु घालवू नको हानीन धरुन" आम्ही दोघेही हसू लागलो.
सदासर्वकाळ मित्रांच्या मांदियाळीत असणारे शैलेश सर
कधीच दु:खाचा बाऊ व सुखाचा माज करत नाहीत.
त्यांची भेट नेहमीच चैतन्यदायी असते.
सुविकोळेकर
Comments
Post a Comment