शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग १९

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध १९


बिंदू बर्‍याच दिवसांनी कॉलेजला आली होती. नितीन व शंतनु दोघेही तिला भेटतात. शंतनु तिला बघताच विचारतो "अरेच्चा दर्शन दुर्मिळ झालंय तुमचं" म्हणत हात जोडतो. बिंदू उगाचंच कसनुसं गालात हसते.
दूरवरुन रेणू येताना दिसताच नितीन म्हणतो" हो ना काही लोकं नगो नगो म्हणलं तरी तोंड‍ाम्होरं दिसत्यात"
शंतनु मागे वळतो व येणाऱ्या रेणूकडे बघून डोळे मिचकावत हसतो.बिंदू त्या दोघांना हटकते
" काय रे तुम्ही "

रेणू यांना सामील होताच नितीनकडे बघत शंतनुला विचारते." काय बोल्ला रे हा "
शंतनु नकारार्थी मान हलवत म्हणतो काही नाही गं असंच
" नाम लिया ओ शैतान हाजिर "
रेणू त्याच्याकडे बघत म्हणते " सुधरणार नाही हा गावठी"
नितीन " असूदेत रेणूताई लय नगो शेंडा हाणूस हिथं तर राहताय मास्तर कॉलनीत अन् टेंभा करताय मंबईचा."
"मास्तर नाही शिक्षक कॉलनी म्हण." रेणू म्हणते
"तेच ते 'गावठी' नाही गावाकडचे म्हणावं" नितीन म्हणतो
"गपा रे" बिंदू बोलते.
"असो
बोला बाईसाहेब कुठे अद्रृश्य झाला होतात.इतके दिवस.?
रेणू विचारते. बिंदू बोलू लागते." नाही गं कामं होती घरी."
या मुलींचं बोलणं सुरु असतं तोवर हे दोघे बाजुला होत गप्पा मारु लागतात.
एवढ्यात रेणू
" क्काय? पाहुणे " असं किंचाळते.
हे दोघेपण तिकडे बघतात.शंतनु भुवया वर करुन विचारतो."काय झालं" रेणू "काही नाही काही नाही" म्हणत विषय संपवते. बिंदू तिला गप्प राहण्याविषयी सांगते. थोड्या वेळात सगळेजण आपापल्या वर्गात पांगतात.
बिंदूला पाहुणे बघून गेलेत हे ऐकूनच रेणूला धक्का बसला होता. तिच्या डोक्यातून तो विचारच जात नव्हता.
अजून कॉलेज सुरु आहे मग हे काय मधेच लग्नाचं.घरच्यांना काय एवढी जड झालेय काय शिकवायला अन सांभाळायला. हाच विचार तिच्या मनात रात्रभर घोळत होता. ती स्वत:लाच विचारु लागली " माझ्यावर ही वेळ आली तर काय होईल" या विचाराने तिच्या मनात ध स्स व्हायचे. मग तिच्या मनात शंतनुचा विचार यायचा मग मात्र ती शांत होई.

इनामदाराच्या वाड्यावर गर्दी झाली होती. काही बायकांचा हुमसुन रडण्याचा आवाज येत होता.गडी माणसं पायर्‍यावर मान खाली टाकून बसली होती.
स्वता: इनामदार एका खांबाला टेकून सचिंत बसलेले होते. नितीन कुतूहलाने वाड्य‍ाच्या द्वारावरुन अात डोकावतो. आत जावे या विचारात असतानाच काही वयस्कर बाईमाणसं बाहेर येताना दिसली. नितीन आत जातो.पण कुणाला विचारावं अन काय विचाराव हाच गोंधळ होता.
तोपर्यंत तिथंच काहीजण हळूहळू बोलू लागले.
" पाव्हणा लय देवगुणी "
सुपारीच्या खांडकाचंबी यसन नव्हतं "
पर काय करणार देवाचीच इच्चा म्हणायची"
नितीन अंदाज बांधू लागला.
कोण तरी नातेवाईक वारलेत बहुतेक.पण नक्की कोण हे पक्कं होत नव्हतं.
" दवाखानं तरी किती करायचं"
पार बेळगावापावतर डाक्टर केलं.पैका तर पाण्यावाणी घातला बापानं पण लेकाला नाही वाचवू शकला"
नितीनचं तर्क बांधणं सुरु होतं . "तरुण मुलगा गेलाय कुणाचा तरी " असं मनातच म्हणतो.
तोवर एकजण कुजबुजतो.
"इनामदारानी एक बरं केलं जावाय वारलं अन् मैतीच दिवस करुन झालं की लगबगीनं लेकीला घेऊन आलं"
पण वंगाळ वाटतय तिच्याबरुबर त्या लहान लेकरांच"
अजून वरीसबी झालं नाय आणि बाप निघून गेला."
आता ही तरणीताठी लेक अन् नात कुठवर दिवस काढायचीत"
एकजण बोलतो "पण पार्टी लय दांडगी पंधरावीस यकर नुस्ता ऊस हाय"
मग मघाचाच पुन्हा उसळतो.
" आपलं माणूस निघून गेल्यावर काय पेटवायचाय व्हयं ऊस अन् ती जिमीन"
नितीनला विषय समजतो. इनामदाराच जावाय मरण पावलेत. अन् लेक लहान मुलीला घेऊन इकडं माहेरी आलेली आहेत.त्यांची सांत्वना करायला ही गर्दी जमलीय. काहीजण तिथून बाहेर पडू लागतात.नितीनपण बाहेर पडतो. तोवर निघता निघता एकजण बोलतो.
"पाव्हणा लयच लवकर गेला वंगाळ झालं"
तोवर दुसरा दबक्या आवाजात म्हणतो.
"आवं मरणाचं गुटखा खायाचं मग राहिल का जाईल बगील तवा तोंडात नुसता गुटखा"
नितीन हे ऐकून अवाक होतो.
काहीवेळआधी "सुपारीच्या खांडकाचंबी यसन नव्हतं " असं कोणतरी म्हणत होतं.
नितीनला या परस्परविरोधी वक्तव्यांचं आश्चर्य वाटतं.
घरी आल्यानंतर आईला विचारतो." इनामदारांच जावाय कशानं वारलं विचारतो " आई म्हणते
" आजारी हुता पाव्हणा त्यातच जास्त झालं अन गेला बिचारा"
आई बोलतंच असते " लेक शिकायचं म्हणत हुती पर इनामदारांन लावलं लगीन , चांगली शिकली असती वरीस दोन वरीस काय जड झाली हुती व्हयं "
आता कसं निभायचं कडवर, "
"पाव्हणा अन् जड झालीय काय" हे शब्द त्याच्या कानात घुमु लागतात . . .
अन रेणू व बिंदू दोघींच्या संवादाचा तो तर्क लावतो . .
" बिंदूला पाहुणे बघुन गेलेत "
अन् उगाच पोटातील कालवाकालव गुडघे दुमडून थांबवण्याचा प्रयत्न करु लागतो. . . .

क्रमश:
सुविकोळेकर(c)@



Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६