पिंट्या: एक मैत्र
पिंट्या:
इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत असलेला आमचा एक मित्र. हुषार असा की त्यास कोणत्याही गोष्टीची उजळणी लागत नसे.वर्गात शिकवलेल्या पाठावर तो परिक्षा देऊ शकायचा.त्यावेळेस मुलामुलींच्यात चाचणी किंवा सहामाही परिक्षेत कुणाल किती गुण पडलेत याविषयी कुतूहल मिश्रीत ईर्षा असायची. एकमेव असा पिंट्या असायचा की त्याच्याजवळपासही कुणी नसायचो. म्हणजे त्याला ९६ गुण मिळाले तर आम्ही ६९ असायचो पण त्याला त्याचा गर्व कधी नसायचा. बर्याच वेळा तो वर्गाचा मॉनिटर असायचा. तो समजूतदार व सर्वमान्य असल्याने(आमच्यासारखी) टुकार मुलंही त्यावेळेस दंगा करत नसत.आमच्या सर्वांच्यात उंच व मजबूत असल्याने कबड्डीतही तो असायचाच. खेळाशी अतिशय प्रामाणिक व न चीडता कबड्डी खेळायचा.खुन्नस वगैरे असला प्रकार त्याच्या मनात नसायचा. कबड्डीची एंट्री करतानाही अतिशय निरागस व सात्विक पद्धतीने अपारंपारिक चाल करायचा. स्कॉलरशीप किंवा त त्सम स्पर्धा परिक्षा तो हसत हसत पार करायचा. आमचे गणिताचे शिक्षक तर उदाहरण दिल्यानंतर सोडवून झाल्यानंतर "त्यालाच " विचारायचे"नांगरे बरोबर ना" यावर तो किंचीत हसत मान हलवायचा.
गणित न समजनार्या मेंढराच्या कळपात आम्ही असायचोच. पिंट्या बाळबोधपणे समजून सांगायचा. आम्ही पामर खुश व्हायचो पण बुध्दीमर्यादेमुऴे गणितात काठावरच पास व्हायचो. हा पिंटू प्रत्येक शनिवारी रविवारी म्हसरं घेऊन शेतातही जायचा व शेतात मदत करायचा . नववीला असताना साक्षरता अभियान मोहीमेत एका वस्तीवरुन येताना त्याचा सायकलवरुन पडून मोठाच अपघात झाला होता. यावर त्याच्या बाबांनी तात्काळ शाळेस विचारणा केली होती. तेव्हापासून आमचे ते साक्षरता अभियान मोहीमेचे वर्ग बंद झाले.(त्याचाआम्हाला आनंद झाला होता)दहावीत याच्या घरी अभ्यासाला जायचो सोबत संदिप शिंदे असायचा . आम्ही पुस्तकात मान घालून बसायचो पण पिंट्या तिथे नसायचा.
त्याचे वडील विचारायचे तर त्याचा भाऊ सांगायचा " त्यो टीवी बगाय गेलाय" पिंट्या म्हणजे त्याकाळी सायंकाळचे टीवी वरील कार्यक्रम हमखास बघायचाच."अलीफ लैला, चित्रहार ,छायागीत, आणि शुक्रवार शनिवारचा चित्रपट. अमिताभ बच्चनचा जबरदस्त फॅन.परिक्षा असो नायतर नसो. हे दूरदर्शन प्रायोजित कार्यक्रम बघनारच.
हा पिंट्या म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन चा समर्थक त्याला अझर खूप आवडायचा ( आणि आम्हाला संगिता बिजलानी :"गजरने किया है इशारा: ओये ओये")
पिंट्याचे खरे नाव" प्रकाश" त्याला कुणीच त्या नावाने हाक मारत नसे.
इयत्ता दहावीत तो आमच्या शाळेचा आदर्श विद्यार्थी होता. ही निवड करताना मुलींच्यातून मतदान घेतले होते. आमच्या त्या काळात मुलांमुलीच्यात बोलणे किंवा चर्चा करणे म्हणजे "अरारारा" लय मोठा गुन्हा आसायचा त्या काळात पिंट्याला मुलींनी बहुमतांनी निवडून दिले होते हे त्याच्या लोकप्रियतेचा पुरावा दर्शवते.
दहावीच्या तत्कालीन बोर्डाच्या परिक्षेत पहिला आला होता.त्याचे नाव शाळेतील बोर्डावर झळकत होते.
पुढे वालचंद कॉलेज सांगली येथे अभियांत्रिकी पदविका घेऊन , अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा येथून पदवी घेतली.सामान्य अभियंत्याप्रामाणे मुंबई जवळ करत पिंटू मुंबईत सेटल झाला . . .
महिनाभरापूर्वी त्याचा फोन आला होता . चाळीस मिनीटे बोलत होतो. यापूर्वी कधीच इतकं बोलणं झालं नव्हत.
काही अपरिहार्य कारणास्तव नोकरीतून राजीनामा दिला होता. . . .
काहीतरी हलकं झाल्याच्या भावनेतून तो भरभरुन बोलत होता. पुन्हा जॉब लागेल न लागेल याची किंचीतशी ही काळजी त्याच्या बोलण्यात नव्हती. . तोच आत्मविश्वास जाणवत होता . . .
आमच्या ग्रुपमधे पिंट्या एक महत्वाची असामी आहे.
त्याहीपेक्षा आमचा मित्र १९९८ ला दहावीत बोर्डात आला होता व तो तेव्हा हा आमचा मित्र आदर्श विद्यार्थी होता याचा अजूनही अभिमान आहे . . ।
सुविकोळेकर
Comments
Post a Comment