पंधरावर्षांपूर्वी . . .
पंधरावर्षापूर्वी . . . . .
एका खाजगी क्रृषीमहाविद्यालयात "सहायक प्राध्यापक" या भारदस्त नामाखाली माझ्यासारखं भारदस्त नसणारं व्यक्तिमत्त्व विद्यादानाचे कार्य पार पाडत होते. शेवटी कॉलेजनंतर अर्थार्जन हे जरुरीचं असतंच.त्यातून ही काहीतरी अजून पाहिजे या जाणिवेतून भारतीय अग्रगण्य वित्तीय संस्थेत चंदीगढ, भोपाल ,पटना, हैदराबाद व मुंबई इत्यादी विभागात नोकरीसाठी अर्ज केला. यासंदर्भात नवनाथ(अण्णा) अवताडे व सुनिल जाधव यांनी माहिती पुरवली. काही दिवसांनी भोपाल विभागातून कॉल लेटर आल्याचा घरुन फोन आला . म्हटलं "चलो भोपाल." भोपालची मानसिकता केली तोवर दुसर्याच दिवशी सकाळी सकाळी फोन आला. तेव्हा नेटवर्क सर्वत्र उपलब्ध नसायचे.आमचं एयरटेलचं सिमकार्ड त्यामुळे मोबाईल उंचठिकाणी ठेवायला लागायचा. दिवसभर मोबाईल उंच ठिकाणी ठेवून कॉलेजवर विद्यादानास जायचे दुपारी जेवणाच्या सुटीत आल्यानंतर मिसकॉल असतील तर कॉल करुन बघायचे. यथावकाश समजले की मुंबई विभागाचे पण पत्र आले आहे. मग म्हणालो " रहने दो भोपाल . . चलो मुंबई" घरी जाऊन कॉल लेटर घेतलं. बघितलं तर सदरची पुढील प्रक्रिया (GDPI)पुण्यात होती. बरं वाटलं.
पुण्यात नवनाथ अवताडे स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करत होताच. प्रविण देशमुखच्या रुमवर थांबलो. मन लावून ( राव खरोखर )अभ्यास केला. सोबत सिन्सिअर अण्णा होताच.परिक्षेचा दिवस उजाडला. संस्थेच्या ठिकाणी पोहोचलो. आमच्यासारखे अनेकजण होते. काही दिग्गज होते. एकमेकांशी ते गप्पा मारत होते. बहुतेकजण अपटूडेट टाय वगैरे लावून मुलाखतीसाठीचा ड्रेसप करुन होते. दहाजणांचा ग्रुप करुन प्रत्येक गटांस आत बोलावून त्यांचे " ग्रुप डिस्कशन"(समूह चर्चा) घडवून आणले जायचे समोरच परीक्षक असायचे. साधारण दहाजणांच्या ग्रुपला बोलावले . आम्ही आत जाताच गोलाकार स्वरुपाची बैठक होती. चर्चेचा विषय होता बचत गटांना अर्थपुरवठा. अर्थातच टॉपिकची अगोदरच तयारी असलेने थोडासा दिलासा मिळतोय तोवर एक टायवाल्याने अनपेक्षितच बोलायला सुरुवात केली. मला धक्काच बसला. माझी अवस्था म्हणजे शालू बाजारात आलेली बघून लपणाऱ्या फॅंड्रीतल्या "जब्यासारखी" झाली.
त्याचे संपतेय तोवर मी मी म्हणत सगळे "बचतगटावर" तुटून पडले. बहुधा परिक्षक सर्वांच काळजीपूर्वक ऐकत काहीनाकाही टिपत होते. थोडासा कानोसा घेत मीही माझे म्हणने मधेच सुरु केले. नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनुस यांचे नाव घेत त्यांचे बचतगटांबद्दलचे माझे अर्थज्ञान यथायोग्य सांगितले. माझे "मराठ मोळे "इंग्रजी एेकून श्रोते चक्रावलेले होते. ( अरे कहना क्या चाहते हो?) असाच त्यांचा प्रश्न असावा.तोवर तो मघाचा "टायवाला" पुन्हा बरऴ ला " सो फ्रेंड्स लेट्स वी कनक्लुड . . " तोवर परिक्षकांनी हात करुन थांबवले.अजून बरेचजण बोलावयाचे होते त्यांनाही बोलायला लावले. साधारण अर्धापाउण तासात सगळे बाहेर आलो. नंतर वैयक्तिक मुलाखत होती.तोपर्यंत धाकधुक होती. एकेकजण बाहेर येत होता. माझा नंबर आला.
" मी आलो ,मी पाहिलं ,मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. . . " असं काही झालं नाही. आत जाताच मुलाखतीचे काही अघोषित संकेत पाळत एका खुर्चीवर अवघडून बसलो . तिन जणांची टीम होती. पहिल्या परीक्षकांनी प्राथमिक व कौटुंबिक पार्श्वभूमीचे प्रश्न विचारले. दुसर्या परीक्षकांनी हातात सहायक प्राध्यापकाचा जॉब असताना " हिकडं कुठं?" असा प्रश्न विचारला. यावर प्रामाणिकपणे माझं मत व्यक्त केलं.त्यांनी मान हलवत. इतर छंद विचारले मी वाचन व लेखन सांगितले.
सध्या काय वाचताय.?
"संभाजी" मी
लेखक ?
विश्वास पाटील मी बोललो
त्यांची अजून कोणती पुस्तके वाचलीत?
"झाडाझडती " मी सांगितलं.
तुम्ही लेखन कोणत्या प्रकारचं करता?
स्तंभलेखन? मी बोललो
कोणत्या पेपरला?
दै.लोकमत (सातारा)"गावगप्पा "नावचं सदर लिहीतो.
अतिशय उत्साहाने मी सांगितले.
ओके ओके
तोवर
सबजेक्ट मॅटर स्पेशलिस्ट यांनी क्रृषी व पूरक बाबींवरील प्रश्न विचारले. गायी म्हैशींच्या स्थानिक विभागवार जातींची माहिती विचारली. तसेच त्यांच्यातील ब्रीडींग संदर्भात विचारले.
त्यातच त्यांनी " ग्रेडींग अप " पद्घतीविषयी विचारले.
मी सांगु लागलो . बरंच काही उत्तराच्या आजूबाजूनेच बोलू लागलो.
साधारण शेवटी शेवटी अचूक उत्तराभावी मला शांत बसावे लागले.
"ओके गुडलक" म्हणाले
सगळ्यांचे आभार मानून मी बाहेर पडलो.
जे होईल ते बघू म्हणत निघालो. संस्थेने येण्याजाण्याचा तिकीटाचा खर्च दिला होता.याचंही अप्रूप वाटलं.
काही दिवसांनी निवड झाल्याचे समजले. आनंद झाला.
यथावकाश मेडिकल तपासणीसाठी बोलावले. तिथे आमचा एक मित्र महेंद्र सूर्यवंशीपण होता. त्याचीपण निवड झाली होती.तपासणी होईपर्यंत तो थांबला.नंतर तेथील अधिकार्यांनी सांगितले तुम्हाला मेडिकल परिक्षा पास झालेनंतर प्रशिक्षणासाठीचा फोन येईल.
मग काय तसाच गावी गेलो.
दोन दिवसांतच महेंद्रचा फोन आला
ट्रेनिंगला गोव्याला जायचं आहे. पुणे ऑफिसचा फोन आला होता. अर्थात मला फोन आला नव्हता तरीही मी त्याच्यासोबत बसने कराड ते गोवा गेलो. गोव्यात सायंकाळी पोहोचलो. संस्थेची सोय व सुविधा अफलातून होती.
सकाळी चहापाणी उरकून प्रशिक्षण वर्गात बसलो. साधारण माझ्या त्या बॅचमधील सर्वांना प्रशिक्षणासाठीचा फोन आला होता. मलाच आला नव्हता तरीही मी आलो होतो.
मला राहवले नाही.
मी ज्या नंबरवरुन बाकीच्यांना फोन आले होते त्या लँडलाईनवर मी फोन केला.पलीकडुन शुध्द मराठीत
"हं बोला" असा आवाज आला.
मी एकदम सांगितलं
"मला मेडिकल फिटचा फोन आला नाही पण मी गोव्यालाट्रेनिंगला आलोय." असं ऐकताच!
"क्काय ?असा समोरुन आवाज आला.
"अहो तुम्ही परस्पर कसं काय गेला? "
"एवढंही कळत नाही काय? "फोनवाली
(कसं कळेल मी काय पुण्याचा आहे ? एवढंच कळायला)
" आव मॅडम आमच्या गावाकडं रेंज नस्ती मोबाइलला मला वाटलं मलाही फोन केला अासशीला पण लागला नसेल म्हणून आलो."
"अरे वा शहाणेच आहात की"
(मनात म्हणालो" न्हाय मी कोळेकर .शहाणे तर रेणुका आहे")
नाव काय तुमचं? मोबाइल नंबर द्या तुमचा. "मी सांगेपर्यंत लेक्चरला बसू नका "असा दम दिला.
मी नाव नंबर दिला.
(बोंबला . . .कराड गोवा तिकीटखर्च अंगावर पडणार बहुतेक! असं वाटून गेलं)
तासभर प्रतिक्षा कक्षात बसलो.
का? ते कुणालाच सांगितले नाही.तिकडून फोन काय येईना.म्हणून उगाचच नोकिया ११०० उंच धरु लागलो (रेंजचा प्रॉब्लेम वगैरे असेल तेही पणजीत गोव्यात?)
पण फोन काही येईना.
शेवटी बहुतेक "आपला पोपट झाला आहे"
"चलो माघारी" असेच वाटले. म्हणून रुमवर आलो व बॅग भरु लागलो. अचानक नोकियाचा फोन खिशात घुरघुर करु लागला.समोरुन त्याच बाई बोलल्या
" अं कोळेकर का?
मी म्हटलं " होय होय ! !"
करा तुम्ही कंटिन्यू"
तिकडून 'कडखडाट ' करत फोन ठेवल्याचा आवाज आला
बाईंनी माझं "थँक्यू " पण ऐकलं नाही
असो . . .काठीन् घोंगड घेऊद्या कीरं मलाबी लेक्चरला येऊद्या की म्हणत लेक्चर हॉलकडे पळालो . . .
@सुविकोळेकर
Great, wish you a very happy successful and prosperous journey ahead
ReplyDeletedhnywad
Deleteवाचलं आताच खूप दिवसांनी ती आठवण झाली तुला... आणि same जसचे तस ध्यानात ठेवतो हे विशेष... हा प्रसंग मला माहिती नव्हता तो आज कळलं.... पण एक विसरलास मीही तो इंटर view दिला... पण आपण मितभाषी सवय आड आली, तसेच अनुभव इंटर view चा नसलेने. आमचं नाही जुळलं तिथं... मग नंतर आम्ही बिगर मुलखतीच्या कृषी सहायक पदावर कृषी विभागात जॉईन झालो. सद्या आहे ह्या जॉब ला मी तर खुश आहे. तुमचं बँकिंग चं माहिती नाही पण बरेच जण टेन्शन च बोलतात... पण पगार फॅसिलिटी चांगली असलेने ते बरंच असेल असं वाटतं... शेवटी दुरून डोंगर साजरे... जावे त्याच्या वंशा, तेव्हाच कळे, या म्हणी ची आठवण येते. ज्याला त्याला त्याचा जॉब सोडून दुसऱ्याचा चांगला वाटतो... अश्या अर्थाने 🙏🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मित्रा सदैव 💐💐
ReplyDelete