एक मैतर : " स्प्रृहनीय "
एक मैतर : " स्प्रृहनीय "
त्याची अन् माझी ओळख इयत्ता दुसरीत असतानाची.तो आपल्या मामाकडे शाळेला आलेला होता( पूर्वी तशी प्रथा पद्धत होती) त्याचे गाव म्ह्मणजे सह्याद्रीच्या मोरगिरी खोर्यात एका पूर्वपश्चिम डोंगर रांगेच्या उत्तरेकडील तीव्र उतारावरील कुसरुंड गाव !समोरुनच वाहणारी मोरणा नदी! निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेला परिसर. त्याच नाव संदीप. आमच्या शब्दशः महान अशा "जीवन शिक्षण विद्यामंदीर " जि.प.च्या शाळेत दुपारच्या सुट्टीत आम्ही गोट्या (आयरे, गैरं) खेळायच्या नादात शाळेत उशिरा पोहोचायचो. बाईंनी विचारताच.
" जळण आणायला गेलो होतो."असं खोटंच सांगायचो.
बाईंनी मला विचारताच संदीप म्हणायचा " त्योबी माझ्याबरबर आला हुता असं खोटं सांगायचा.अर्थात छड्या मिळायच्याच.
जसजसं वय वाढत होतं तसा संदीप प्रगल्भ होत होता. प्रचंड कष्टाची सवय. सुटीच्या दिवशी गुरं चरायला जात असू त्यावेळी एखादं अभ्यासाचं पुस्तक हमखास जवळ असणार. वास्तव परिस्थितीची दाहक जाणीव असणारा.
दणकट शरिरयष्टी! तो कबड्डी उत्तम खेळायचा.क्रिकेटही दमदार खेळायचा. निखळ विनोदी असणारा तो नंतरनंतर काहीसा मितभाषी होत गेला. दहावीत(१९९८ ला) सत्तर टक्क्याने पास झाला.अन कोणताही जास्तीचा विचार न करता आम्ही शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था कराडचा अर्ज भरला.त्याला प्रवेशाचे पत्र आले .पण संदीप यशवंत शिंदे या नावाचे ते पत्र पोस्टमन काकांनी एका दुसर्याच संदीपच्या घरी दिले की जो चौथी पाचवीला असेल.
आम्ही शहानिशा करत पोस्टमन काकांकरवी त्यांच्या घरी जाऊन पत्र मिळवले. पोस्टमन काकांना आवर्जून सांगितले की जर याच्या नावचे अजून एखादे पत्र आले तर त्याच्या मामांचे किराणा मालाचे दुकानात देणे.काकांनीही काळजीपूर्वक होकार कळवला.
आम्ही पत्र पाहिले बहुधा " मोटर मेकॅनिक" या शाखेसाठी प्रवेशाचे पत्र होते. तेव्हा मलापण " फिटर (जोडारी) शाखेचे प्रवेशपत्र मिऴाले होते. तिकडे आमचा प्रवेश होतोय न होतोय तोवर काही दिवसांनी पुन्हा एक मला पत्र आले" इलेक्ट्रॉनिक्स:यांत्रिक रेडिओ टीव्ही दुरुस्ती" शाखेचे प्रवेशपत्र.
मी धावत संदीपकडे गेलो. "तुला पत्र आले आहे काय?
यावर संदीप 'नाही 'म्हणाला.
आम्ही तसाच मोर्चा पोस्टमन काकांकडे वळवला.
" आरे टाकलंय की दुकानात पत्र" काका म्हणाले
आम्ही धावत धावत दुकानाकडे आलो. पावसाळ्याचे दिवस होते.एका गिर्हाइकाच्या पायात चिखललेले ते पत्र मला दिसले मी उचलून घेताच संदीपने लगबगीने उघडले.तर
"इलेक्ट्रिशियन :विद्युत तारतंत्री " या शाखेचे कॉल लेटर होते आणि एकदाची संदीपची स्ट्रीम ठरली.
काही कारणाने माझं आयटीआय ला जाणं बारगळलं.वडिलांनी अकरावी बारावी कर मग बघू फुडचं फुडं"
संदीपने होस्टेलला राहून जेवण हाताने बनवून( बहुतांशी स्वावलंबी )आयटीआयचा कोर्समधे जीवापाड अभ्यास करुन पहिल्या नंबरात यश मिळवले.अप्रेंटिसला तो बत्तीस शिराळा जि.सांगली येथे गेला. तुटपुंजा मानधनावर दिवस काढून संदीपने पुणे जवळ केले. कसलेही व्यसन नसणारा संदीपने खाजगी कंपनीत शिफ्ट्समधे नोकरी करत करत कुटुंबाची शैक्षणिक व शेतीत प्रगती केली.कधीतरी आमची भेट व्हायची.पत्रव्यवहार व्हायचा.
खरा ट्विस्ट तर आता आहे.नोकरी करत करत अतिशय अवघड अशी इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग ची पदविका(डिप्लोमा) संदीपने संपादन केली. त्यायोगे नोकरीत त्याला लाभ झाला असावा . वाचनाची गोडी जपनार्या संदीपला आपण ठरवलं तर काहीही करु शकतो याचा त्याला प्रत्यय नक्कीच आला.अर्थात यशाने हुरळुन जाईल तो संदीप कुठला.काही दिवसांत महावितरण ची नोकरीची जाहिरात आली अन् संदीपची विनासायास निवड झाली
.अन् . . सरकारी नोकरी . . पक्की झाली.
एकंदर प्रवासात मागे फिरुन बघताना त्याने"स्प्रृहनीय" शब्दाला नक्कीच न्याय मिळवून दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरु नये!! !!!!!
सुविकोळेकर(c)
Comments
Post a Comment