शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग अठरा
पहाटे पहाटे बाहेर गोठ्याकडे आबांचा व आईचा आवाज येत होता. उठू की नको या द्वंद्वात नितीन तसाच पडून
राहिला. थोड्या वेळात पुन्हा जास्तच कुजबुज वाढू लागली.आईचा कातर आवाज येऊ लागला.मग मात्र तो डोळे चोळत उठला.बाहेर तिन चार जणांची गर्दी होती आबा डोक्याला हात लावून बसले होते. आई गोठ्यात हुमसुन रडू लागली होती. नित्याला कारण समजत नव्हते. बारीक भुवया करुन तो आईकडे गेला .
त्याने नजरेनेच विचारले." का रडतेस" आईने मग दावणीत लाकडावर मान टाकलेल्या म्हशीकडे पाहिले.
ते बघून नितीनला धक्काच बसला. म्हशीचे विस्फारलेले डोळे भेसूर दिसत होते पाय ताणलेले होते तोंडात फेस सद्रृष्य द्रव बाहेर आला होता. त्यांची दुधाची म्हैस अशी मरणासन्न पाहून त्यालाही वाईट वाटलं. हिच्याच दुधाच्या भरोशावर किमान घरखर्च व एस.टी.चा पास तरी निघायचा.
पहाट संपली होती बहुधा उजाडलं होतं.आता
काही माणसं हातात टमरेल सांभाळत बघत बघत जात होती.काही " जाऊन "आलेली मशेरी घासत तिथंच उभी होती. गर्दी बोलू लागली होती.
"वैरणीतनं काय तरी पोटात गेल असंल"
कुणीतरी म्हणालं "इच्चूकाटा न्हाय हिथं पर सांगता येत नाही"
एक म्हातारी बाई म्हणाली " दावणीचं दुभतं जनावर गेलं बया लय वंगाळ झालं"
नित्याच्या मनात विचार सुरु " आयशपथच हिला आता उचलून न्यायची कशी अन वड्यात टाकायची . . . .
छे छे . . . वड्यात नाय टाकायची . . . .कावळं अन् कुत्री टोचून खातील तिला . . .
तोवर दुसरा विचार
आरं खाऊदे की मेल्या म्हशीला टोचलं काय अन वचकारलं काय सारखंच."
तोवर पुढचा विचार
"आरं पर तू जिवंत हायस ना?
हिच्याच दुधावर जगलास ना?
"इसरलास का लगीच?"
त्याच्या मनातलं द्वंद्व काही संपत नाही.
इतक्यात एकजण
" आबा जनावर वास मारायच्या आत उचलाय लागंल"
"टाकलं पाहिजे लांब कुठतरी"
आबानी गळ्यातला रुमाल डोक्याल बांधत.हाक मारली.
" नितीन ते टिकाव खोरं घ्या करंजीच्या झाडखाली डबरा काढला पाहिजे."
नित्याला समजले म्हणजे म्हशीला आता जमिनीत पुरावी लागणार
आबा काहीवेळातंच बैलगाडी आणतात.
सहज उचलावं अन टाकाव अशी परिस्थिती नव्हती.
दहाबारा गडी जमलेले होते. उभ्या बैलगाडीत ते म्रृत
जनावर चढवायचं कसं हा प्रश्न नित्या समोर होता.
दोन मजबूत बांबू म्हशीच्या अंगाखालून घातले जातात.
ते घालताना तिच्या पायांची दुमड व असंबद्ध हालचाल
नित्याला बघवत नव्हती.
पुढच्या पायातून अंगावरती पूर्ण रश्शीने बांधले. ती रश्शी पुढच्या बाजूने गाडीतील दोघांच्याकडे ओढायला दिली.
एक गडी ओरडतो "चला एक जोर"
दोन्ही बाजूचे चार चार असे आठ व गाडीत दोघेजण अशा दहाजणांच्या शक्तिनिशी ते धूड उचलायला सुरुवात झाली. "ह्यं हंम्म " असा जोर लावनारांचा अावाज आला.मुंडक्याच्या बाजूनं जनावर गाडीत चढवलं गाडीतले रश्शी खेचतच होते.
"आरं रेटा मागनं ढकला ढकला " असं म्हणत असताना
मागच्या बाजूला जास्त जोर होऊन धूड पुन्हा "धापकन" जमिनीवर पडतं.
सगळेजण एकमेकांकडे बघतात.
आबा काहीच झालं नाही या सूरात " माग जरा जास्त बोजा हाय चला पुन्हा एकजोर" म्हणत बांबूला हात घालतात. यावेळेस नितीन मागच्या बाजूला येतो .
"हं . . s s s एकजोर सोडू नका"
मुंडकं गाडीतून पुढ ओढलं जात . . .
पुढचे पाय आत जातात. . .
"तोवर आरं पाय दुमडा पाय दुमडा तिचं" असा आवाज येतो. आता धूड निम्यापेक्षा जास्त गेलं होतं पुढचा बांबू काढून घेतला होता.
मागच्या बाजून जोर लावला जात होता नित्या हातानेच म्हशीला रेटत होता. कसंबस जनावर बैलगाडीत बसवलं जातं.
बैलगाडी म्हशीची "मयतवारी" घेऊन शेताकडे निघते. जाताना वाण्याच्या दुकानातून दहा किलो मोठ्या खडयांच मीठ घेतलं जातं.
करंजी खाली खड्डा खोदणं सुरु होतं. नित्या पटापटा माती भरुन टाकत होता. साधारण कमरेपेक्षा जास्त खड्डा होतो. आबा बास करा म्हणतात. सोबत आणलेलं मीठं खड्ड्यात विस्कटलं जातं. गाडीतलं धूड उतरताना जास्त वेळ नाही लागला. तितक्याच लगबगीन ते खड्यात ढकलंल. माती टाकली.मीठाचा थर मारला पुन्हा माती व मीठ टाकतात.जमिनीपासून वितभर जास्त थर लागला होता. काटेबाभळीच्या फांद्या त्यावर आणू टाकतात.त्या जागेवर काही दगड आणून ठेवले जातात.
म्हशीचा दफनविधी पार पडला होता.
म्हैस कशान गेली असेल या चर्वितचर्वणात सर्वजण
घर जवळ करतात. आबांच्या चेहर्यांवरचे दु:ख लपत नव्हते. नितीनची परिस्थिती वेगळी नव्हती.त्याची कॉलेजला आज दांडी पडणार होती. . . .
क्रमशः
Comments
Post a Comment