शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग सतरा
" अ . घरात कोण हाय का?" नितीन आवाज देतो.
एक मध्यमवयीन पोक्त स्त्री घरातून बाहेर येते.दरवाजातूनच विचारते.
" काय रं बाळा कोण तू ?काय काम हुतं" स्त्री विचारते.
"माझं नाव नितीन इथं कॉलेजला आहे"
नितीन दचकत विचारतो.
" तुमचं मालक(पती) पुलिस हायती व्हंय?"
"होय बर मग" मावशी विचारतात.
"एक काम हुतं" नितीन बोलतो.
कसलं? मावशी विचारतात.
" आवं मावशी तुमच्या मालकांनी आमची गाडी पुलावर पकडलीवती आणि कागदपत्रं घेतल्याती त्यांनी."
" नितीन सगळी धरपकडीची कथा कथित करतो
मावशीपण बारकाईनं ऐकत असतात.
आम्ही दंड पन्नास रुपय भरत हुतो पण ऐकत नाहीत.पण दंडबी लय हाय दीडशे रुपय." तेवढा दंड कमी घ्याला सांगा की तुमच्या मालकास्नी"
"कागदपत्रं नाय आणली तर घरी आमची धडगत नाही"
त्यो माझा मित्र शंतनु त्याचे बाबा लय कडक हायती " त्यांना माहित नाही यातलं काही.
"माझ्या घरात कळंलं तर आमची आय फोडून काढील मला" नित्या शक्य ते बरळत असतो.
एवढा वेळ दरवाजातच उभे असतात. त्या मावशी आत बोलावतात. नित्या "नको नको" म्हणतो.
"मावशी तुमच्या पाया पडतो पण सांगा तेवढं."
"आयशपथ पुन्हा नाय असं करणार." नितीन कळवळतो.
मावशी " बरं " एवढंच म्हणतात.
नितीन मोठी पाऊलं टाकीत कॉलेजचा रस्ता धरतो.
मावशी गालात हसत आत जातात.
नितीन त्या पोलिसकाकांच्या घरी जाऊन आला होता खरं! पण बेत फसला, तर पुन्हा पंचाईतच होणार.याची त्याला भिती होती.
कॉलेज सुटताना नितीन शंतनु भेटतात. दोघांचेही चेहरे पडलेले असतात. तेवढ्यात बिंदू व रेणू देखील येतात.
" काय झालंय चेहरा का पडलाय तुमचा " बिंदू विचारते.
"कुठं काय काही नाही " शंतनु उसन्या अवसानात बोलतो.
"काहीतरी लपवताय " रेणू विचारते.
" क्रिकेटच्या स्पर्धांना जाऊ नका म्हणालेत याचे बाबा म्हणून हा नाराज आहे"
शंतनु नित्याकडे आश्चर्याने (काहीही थापा बद्दल)बघत राहतो.
"बरं झालं " खुश होऊन रेणू व बिंदू दोघीपण एकदमच बोलतात.
जास्त वेळ न थांबता दोघेही निघतात.
-- --- --- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पोलिसकाका जेवायला घरी आलेले असतात. जेवण सुरु असते. तोवर एक प्रश्न धाडकन् कानावर पडतो.
" व्हय ओ ?ती पुलावर कुणाची गाडी पकडलीसा?" पोलिसपत्नींचा प्रश्न
काहीसं आठवल्यागत " नाय कुणाची" पोलिसकाका
"आवं न्हाय काय पुलावर कॉलेजच्या पोरांची गाडी धरलीसा न्हवं?"
त्यांची कागदं घेतलीसा जणू , दंड नाहीत भरत म्हणून"
मावशी विषय न सोडता बोलतात.
हां हां ती व्हय " विनालायसन गाडी चालवत होते मग दंड हा होणारच" पोलिस घास चावत बोलतात.
" मग जरा अवसानातली तरी चोरी पकडायची एखादा ट्रक नतर टेम्पो तरी धरायचा बारकी पोरं कशाला अडवायची?"
पोलिस काका म्हणतात" नियम सगळ्यास्नी सारखाच"
पोलिसपत्नी पुढं बोलणार तोवर
काकाच बोलतात " पण तुला कुणी सांगितलं हे सगळं ? "
"सांगु द्या कुणीबी " पोलिसपत्नी बोलतात.
पोलिसकाका आवाज चढवून बोलतात.
"हे बघ ते आमचं सरकारी काम हाय उगीच मधीमधी करु नकोस" ( जेवूण हात धुतात)
पोलिसपत्नी उतरत्या आवाजात " तसं न्हाय म्हणत मी लहान लेकरं हायती समजावून द्या सोडून" समजावलं की समजत्यात तीबी"
व जेवनाच ताट उचलत म्हणतात.
" आपलं यकादं लेकरु असतं तर तेबी त्यांच्याएवढंच असतं"
पोलिसकाका शेवटच्या वाक्याने घायाळ होतात.
काहीच न बोलता पायात बूट चढवून पोलिस स्टेशन जवळ करतात. . .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
दोन दिवसांनी नितीन व शंतनु पुन्हा पोलिस स्टेशन
गाठतात . समोर पोलिस काकांना बघून शंतनु धीर धरुन बोलतो.
" साहेब दंड आणलाय "
(नित्याला आश्चर्य पैसे कुठुन आणले)
म्हणत खिशातून पैसे काढतो.
पोलिसकाका हसतात. "पोरानू असं नसतं करायचं सरकार जे नियम करतं ते आपल्याच भल्यासाठी असतात." असू देत दंड आणलास खरं!!
पण राहू दे ही घे कागदपत्रं पण पुन्हा सापडलास तर लायसन असूदेत जवळ!!!"
शंतनुच्या गगनात आनंद मावत नसतो. नितीनही खुश होतो.
दोघेही निघतात. दरवाजापर्यंत पोहोचतात.
तोवर आवाज येतो.
" आरं थांबा "
आवाजानं दोघांचीही टरकते.
"आमच्या घरी कोण गेलं होतं" पोलिसकाका विचारतात.
शंतनु बोलणार तेव्हड्यात नितीन बोलतो.
" साहेब मी गेलो होतो"
" लका लईच लांबचा पण माझ्या जवळचा वशिला लावलास" मानलं गड्या"
म्हणत स्वगतच हसतात . . . ( "निघा"हाताने खुणवतात)
दोघेही निघून बाहेर येतात.
शंतनु विचारतो " कधी गेला होतास त्यांच्या घरी"
"आपलं शिक्रेट हाय" नितीन बोलतो.
नितीन विचारतो. " दंड भरायला पैसं कुठंनं आणलंस?"
"आपलंबी सिक्रेट हाय" शंतनु बोलतो.
दोघांनाही काहीतरी मिळाल्याचा आनंद झाला होता
क्रमशः
सुविकोळेकर
Comments
Post a Comment