शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग सोळा .

 झाल्या प्रकारामुळे शंतनुचे मन खट्टू  झाले होते. त्याच्या समोर एकच प्रश्न होता.कसंही करुन गाडीची कागदपत्रं मिळवायची. घरी सांगून शंतनुस दंड भरण्यास पैसे मिळालेपण असते पण आईच्या रागास सामोरं जाण शंतनुला शक्य नव्हते.

तसेच बाबांचा मग विषयच वेगळा.
काय करावे हे त्या तंद्रीत तो नितीनच्या घरी जातो.
नितीन घरातच सापडतो. अर्थात नितीन दबक्या पावलांनी बाहेर येतो. दोघांची चर्चा सुरु होते.
" उद्या आपण जाऊ पुलिस्टेशनला नितीन बोलून जातो"
पण दंड?? शंतनु विचारतो.
"बघू फुडचं फुडं "नितीन सांगतो.
शंतनु मान डोलावतो.निघून जातो.
(नितीन मनात म्हणतो " झक मारली अन् गाडी काढली")

दुसर्‍या दिवशी नितीन व शंतनु शहर पोलिस स्टेशनला जातात.
इकडंतिकडं बघत असतात.
बरेच लोक काहीनाकाही कुजबुज करत होते.एखाद्या पोलिसासोबत बोलत उभे होते .कुणी विनंती करत होते. काहीजण एखाद्या खाकीवाल्याची मखलाशी करत होते.

पण त्यांना हवा तो पोलिस तिथे नव्हता. शंतनु सुचवतो.
अरे नितीन ट्रॅफिकवाले कुठे असतात ते विचाराव लागेल.
नितीन भुवया उंचावून संमतिदर्शक मान हलवतो.
तिथे जवळच पेपर वाचत बसलेल्या खाकीतील वयस्कर पोलिसाकडे ते जातात. नितीन पेपर निरखून बघतो."नवाकाळ" नवा व काळच्या मधे एक पक्षी पंख पसरुन उभा असतो.
" मामा हिथं ट्राफिकचे साहेब कुठं असत्यात"
ते पेपरातून तोंड काढून बघतात.त्यांना बहुधा मामा म्हणलेलं आवडलं नव्हतं खुणेनेच ते कोपर्‍यांकडे डोळे व भुवया फिरवतात. " आलाय मामाचा " म्हणत पेपरात तोंड खुपसतात.
दोघेही तिकडे जातात.आत कुणीतरी असतं. दबकत दबकत नित्या आवाज देतो
" आत यू का?"
पण प्रतिसाद न आल्याने दोघेजण आत जातात.
समोर कालचेच पोलिस कर्मचारी असतात.
बहुधा छोट्या डायरीत काहीतरी लिहित असावे.
दोघांना बघताच ते म्हणतात.
" काय कॉलेजकुमार आणला काय दंड"
शंतनु बोलू लागतो.
" साहेब नाही "
मग? पोलिस विचारतात.
कोणंच बोलत नव्हतं.संवाद तुटू नये म्हणून
नितिनच बोलतो
" साहेब दंड भरतो पण कमी करा की जरा "
पन्नास रुपय भरतो की "आवं पैसं न्हायीत"
यावर पोलिस कर्मचारी उचकतो
" ऐ शेंगुळ्या तू काय लग्नाला आलायस काय?"
पन्नास रुपय आहेर करायला " नित्या चूप होतो.

"साहेब दुसरा पर्य़ाय ? ? "आता शंतनुचेही धाडस वाढले
पोलिस डायरीतून तोंड वर न काढता बोलतात.
" हम्म आहे की" पोलिस
(शंतनुला हायसं वाटतं )
"गाडी आणून लावा , अनं कागदं घेऊन जावा." असं म्हणत ते पोलिस उठून बाहेर जातात.
यावर शंतनुचा चेहरा काळवंडतो. नित्या मनातून चरफडतो.

दोघे बाहेर येतात. ते नवाकाळ वाले पोलिस अजून पेपर वाचत होतेच. नित्या डोकं चालवतो.
" साहेब एक काम होतं" त्यांना विचारतो.
'नवाकाळ' मधून डोकं बाहेर काढत विचारतात
" काय रं "चंगू मंगू "
नित्या एका दमात संपूर्ण प्रकार सांगतो. नक्कीच पर्याय निघेल असं दोघांना वाटतं.

पोलिसकाका मोठा श्वास घेत म्हणतात
" मग भरा दंड" नितीन मनात चरफडतो व मनातून शिव्या घालतो.
आयघाला "पेपरवाच्या" म्हणत
दोघे गुपचुप निघतात.
शंतनु म्हणतो.
" नितीन चल दुपारच्या प्रॅक्टिकलला तरी जाऊ"
दोघेही निघतात. तोवर तो दंड वाला कर्मचारी गेटच्या बाहेर जाताना दिसतो. नितीन धावत त्याच्या मागे जातो. शंतनुही पळू लागतो.
तो गाडीवर असतो.वेगाने जातो. नितीन धावायचं सोडत नाही. एका ठिकाणी ती गाडी वळण घेते. धापा टाकत तो कसाबसा पोहोचतो. तिथून दूरवर एक दुचाकी उभी असलेली दिसते. दोघेही अजून धावतात. गाडीजवळ पोहोचतात. बराच वेळ थांबतात. शंतनुच्या चेहर्‍यांवर प्रश्नचिन्ह असते .
तोपर्यंत कुणीतरी येत असल्याचा आवाज येतो. नित्या शंतनु थोडे आडोशाला लपतात.मघाचाच दंडवाला पोलिस एका घरातून बाहेर येतो. तो जात असताना बाहेर एक स्री उभी असते. गाडी सुरु करुन तो पोलिस निघून जातो.
शंतनु जवळ येत म्हणतो " चल बाबा प्रॅक्टिकल सुरु झालं असलं"
नितीन काहीतरी ठरवून तिथून कॉलेजकडे निघतो . . . .

क्रमशः . .

Comments

  1. छान, पुढं काय होइल याची प्रतीक्षा लवकर पूर्ण करा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६