शेतकर्यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा
शेतकर्यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा
आई नको नको म्हणत असताना दुचाकीगाडी घेऊन शंतनु व नितीन कॉलेजला जातात.बाबा बाहेरगावी असल्याकारणाने विचारणारं कुणी नव्हतं. अर्थात आईला " आजचा दिवस फक्त असंही बाबा देतच नाहीत गाडी"असं शंतनु विनवून पटवतो.आईला लेकाचं ऐकावंच लागतं. शंतनुला स्वत: गाडी चालवत तालुक्यास जाणं मौजेचे वाटायचं पण त्याच्या बाबांना ती चैन वाटाय़ची.
नितीनही सोबत असल्याने त्यात जास्तच भर पडली.
नितीनला तशी उगाचंच शायनिंग वाटायची पण मित्राला कसं नाही म्हणायचं.म्हणून तोही आनंद घेत होता. गाडीवरुन कॉलेजमधे आत शिरताना मुलामुलींनी यांच्याकडं पाहणं या दोघांनाही अप्रूप वाटायचं. तोच समोरुन रेणू दवे व बिंदू आल्याचं बघताच यांच्या चैतन्यात भरंच पडली जणू यापेक्षा आनंद तो काय.!! "अय्या ते बघ दोघे"असा रेणूचा आवाज येताच त्यांनी गाडी थांबवली. गप्पा मारल्या.थोडीशी ऐट मारली , गाडी वाहनतळावर लावली. शंतनु तर्जनीमधे चावी फिरवत होता .दोघेही आपापल्या क्लासरुमकडे निघाले.
बिंदूची व नितीनची नजरानजर झाली.खरंतर तिला देखील गाडीची चैन पटली नव्हती.तिने नापसंती दर्शवली .
आज बस पकडायची नव्हती.प्रॅक्टिकल संपताक्षणी नितीन बिंदूला दुरुनच हाताने 'निघतो'असं खुणावून पळतोसुध्दा! बिंदूला बहुधा काहीतरी बोलायचे असावे.ती खिन्न मनानेच चालू लागते.
वाहनतळावर शंतनुची वाट बघत नितीन गाडीजवळ उभा असतो.
त्याचं म्हणजे असं झालं होतं "गाडी मित्राची पण ऐट मात्र मालकाची" तोवर शंतनु सकाळच्याच उत्साहाने येतो.
'चलो' म्हणत गाडी काढतो चालू करतो.नितीन मागे असतोच. दोघांना पुन्हा सर्व कॉलेजकुमार व प्राध्यापकवर्ग गाडीवरुन जाताना यांना बघतात यांचे आकाश पुन्हा ठेंगणे होते. उगाच छाती फुगते.' जणू यहां के हम सिकंदर '
दोघेही कॉलेजमधून बाहेर पडतात.साधारण निमशहरी भाग होता. एकंदर "जिंदगी एक सफर सुहाना" असंच दोघांनाही वाटत होतं.रोज असंच गाडीवरुन येता आलं तर किती बरं होईल .असे नितीन मनातच मांडे खात होता पुन्हा लगेच स्वत:शीच बोलंत म्हणे" आपली लायकी काय आपण करतोय काय"असं द्वंद्व मनात सुरु होतं. शंतनुची वेगळी परिस्थिती नव्हती.त्याच्या मनातही एकदिवस रेणूही गाडीवर बसेल तेव्हा तो प्रवास किती स्वप्नवत असेल असा विचार करत होता.
संमोहनमिश्रीत स्थिती , गाडीवरुन लागणारं वारं व मोहाचे विचार याने दोघंही तंद्रीत होते.
शहरवजा गावातून गाडी बाहेर आली.एका पुलावर ' फुर्रर्र असा आवाज आला' तरीही यांना काही समजेना.
पुन्हा एकदा दीर्घ ,"फुर्रर्र "असा आवाज आला.मग नितीनचे लक्ष गेले. " आ . .घातली शंत्या पुलिस"
काय करावे हे न सूचल्यामुळे शंतनुने थांबावे की पळावे या विचारात आचकत आचकत गाडी बंद केली(पडली)
पोलिस आले.
"लायसन?"
शंतनु नितीनकडे बघत म्हणतो
"नाही"
गाडी कुणाची?
कागदपत्रं हैत का? पोलिस विचारतात
शंतनु मान डोलावत " हो हो "
म्हणत डिकीतून कागदपत्र काढून देतो.
पोलिस बघतात.
" हं परब काय ? दंड भरावा लागेल विनालायसन गाडी चालवल्याबद्दल "
"किती??"शंतनु
"दिडशे रुपय" पोलिस सांगतात.
"अहो मामा पैसं नाहीत आमच्याकडं"
नितीन पुढं होऊन म्हणतो.
पोलिसाला ते आवडत नाही.
"तू गपरे शेंगुळ्या"
नितीन गप्प बसतो. शंतनुला काहीच कळत नव्हते.
तेवढ्यात ते पोलिस गाडीचे कागद घेऊन निघू लागतात.
" दंड भरुन कागदं घेऊन जा"
शंतनु ते ऐकताच एकदम घाबरुन खालीच बसतो.
त्याचा चेहरा रडवेला होतो. त्या पोलिसाला विनवणी करावी हे सुचेपर्यंत पोलिस निघून गेला होता.
नितीनचाही गोंधळ उडाला होता.
असंही काही होईल हे त्यांच्या निरागस युवाबुध्दीला कधी वाटलंही नव्हतं.
पाच दहा मिनीटं जातात.
तोवर शंतनु नितीनला म्हणतो." बाबांना कळंलं तर माझी खैर नाही."
सकाळपासून आकाशात विहारणारे त्या दोघांचे विमान धाडकन् जमिनीवर कोसळले होते.
शंतनुचे मन त्याला खाऊ लागले. आई नको म्हणत असताना उगाच गाडी आणली . . . वगैरे वगैरे विचारांनी तो हैराण झाला.
एका क्षणाला नितीन मोठ्ठा श्वास घेत म्हणतो
" ऐ शंत्या जाऊ देत पहिल्यांदा घरी चल तुजे बाबा यायच्या आत घरी जाऊ"
"अरे पण कागदपत्रं ? दंडाच काय?" शंतनु विचारतो
नितीन ओठ दुमडत " निघेल काहीतरी पर्याय"
"नको टेन्शन घेऊस" म्हणतो
शंतनु थोडासा भानावर येतो .गाडी सुरु करतो.
पण सकाळचा उत्साह नव्हता त्यावर पोलिसांनी विरजण टाकले होते.
नितीन मात्र मागे बसून पोलिसाला शिव्या घालत होता.
" त्याच्या आयचा त्याच्या . . .
दुनियेत जिकडं गरज हाय तिकडं सोडून हिकडं पुलावर येऊन मासं धरायला उभा राहिलाय . . आयघाला . . . !!
क्रमशः
सुविकोळेकर
Comments
Post a Comment