शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग चौदा:

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग चौदा:


सायंकाळी घरी पोहोचताच .आई आदेश काढते.
त्यो कोंबडा देऊन ये देवस्कीचा. नितीन नापसंती दर्शवतो.
बाळा आरं आकाड सरत आलाय. तुझ्या 'बा' ला सवड नाय पण देवस्कीचं मागं ठेऊन चालतं का कुठं. मग लागतीया साडसाती मागं.
नित्या तिला थांबवत " आयं मला न्हाय कोंबडा कापायला याचा " आबा करतील ते"
आरं तू नुस्ता आण कापून बाकीचं बघु घरात आल्यावर करु "
आई बोलतच असते.
"मावळतीला पाच दगडं ठेवायची हळदकुकु लावायचं कोंबड्याच्या तोंडात चार ठ्यांब पाण्याच द्यायचं.
अन् घ्याचं देवाचं नाव."
"आयं तूच करकी मग" नितीन बोलतो
"आरं बाय माणसं नाहीत करत हे"

"न्हायव्हय" करत आई कोंबडा पाय बांधून पिशवीत घालून देते. कोंबडा "को को को कोकोच को को को" करत अोरडत असतो. वाटेतून येणारे जाणारे
" हं s आज हाय वशाट "
या नजरेने त्याच्याकडे बघत होते. अवघडून कसाबसा देवस्की च्या ठिकाणी नित्या पोहोचतो . आधीच तिथं अनेक कोंबड्याच्या पिसांची रास दिसत होती.
पाच दगडं ठेवतो.हळदकुंकु लावतो.कोंबड्याला पिशवीतून
काढतो. कोंबडयाच्या पायावर पाय ठेवून त्याच्या चोचीत पाणी देतो. कोंबडा भेसूर ओरडत असतो . नित्या हातात सुरी घेतो. कोंबड्याच्या ओरडण्याने वातावरणात अशांतता पसरली होती. नित्याने डाव्या हाताने त्याची मान गच्च पकडली आता आवाज कमी झाला. तरीही त्याच्या घशातून" घर्र घर्र " असा आवाज येत होता.
बहुधा कोंबडा त्यास आर्जव करत होता. "मी काय बिघडलंय तुझं तू मला का मारत आहेस" नित्याने डोळे घट्ट मिटले त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी चमकले
काहीवेळ जातो.
" त्याचा हात ढिला होतो . सुरी गळून पडते. कोंबड्याच्या पायावरील पाय निघतो. कोंबडा एकाच दमात एवढ्या उंच उडी मारतो मघाचा आर्त मरणाच्यावेळच्या ओरडण्यात व आता उंच उडी मारुन जाताना ओरडण्यात बराच फरक होता. हे नित्याला जाणवंले. त्याला त्याचा आनंद वाटला.

पण आता आईला काय सांगायचं हे ब्रम्हसंकट त्याच्यासमोर उभे ठाकले होते.
बहुधा पराभूत चर्येने नितीन घर जवळ करतो.
आई त्याची वाटच बघत असते. कारण कोंबडा येऊन खुराड्यावर " वाचलो बुवा वाचलो बुवा वाचलो बुवा " असं ओरडत होता.
काहीही सांगण्याची गरज नव्हती.
तोवर आई सुरु होते.
"नुसतंच तालुक्याला साळंला जातंय , ही कामं कुणी करायची," पोरानी कसं चौहास्पी असांवं"
नितीन हळूच म्हणतो.
"आयं साळला न्हाय गं कॉलेजला म्हण"
"गप भाड्या नुसताच गडी झालायस माझा समा (समीर) पायजे हुता. कोंबडा व्हरपळूनबी दिला असता"
म्हणत नित्याच्या चुकीला विसरून जाते.

दुसर्‍या दिवशी फिजीक्सचे सर पेपर घेऊन आलेले असतात. कुणीकुणाला मार्क सांगायची सोय नव्हती.
नुसतीच कुजबुज सुरु होती.
एवढ्यात सर गर्जना झाली.
"ज्याला वाटत आहे आपले मार्कस जास्त आहेत त्याने उभे राहावे."
कुणीही उभं राहत नाही.
वर्गात टाचणी पडली तरी आवाज यावा अशी शांतता .!!
ओके लेटस चेंज द व्हिव्यू. . .
ज्याला वाटत आहे आपले मार्कस कमी आहेत त्याने उभे राहावे. तरीही कुणीच उठंत नाही. . . असं वाटणार एवढ्यात भिंतीकडून कोणतरी उभं राहतं.
शंतनु कपाळांवर हात मारुन घेतो. नेहमीप्रमाणं नित्या उभा राहिलेला असतो.
सर त्याच्याकडे बघून विचारतात " प्लिज टेल युवर मार्कस टू क्लासरुम"
नितीन पुटपुटतो " दोन "(वर्गात संमिश्र हसू पसरते)
"सायलेंन्स"
सरांचा आवाज येतो.
"ट्वेंटी आवट ऑफ टू"
" सी द कॉन्फिडन्स लेवल ऑफ दी गाय विथ हेविंग टू मार्क्स ओन्ली." ( दोन मार्क पण रुबाब बघा)
"आय एप्रिसिएट योर ऑनेस्टी बट इट्स नन् ऑफ युज मिस्टर !"
असो तर मग सांग आता तुला काय कराव लागेल वीस मार्क मिळवायला?
"अभ्यास करावा लागेल रोज" नितीन बोलतो.
आहे तुला शक्य?
"होय शक्य आहे" नितीन सांगतो.
कसे? सर विचारतात.
"सर अभ्यास न करता दोन मार्क पडलेत "
आता अभ्यास करुन पुढचा शून्य मिळवायचाय. "
सर त्याच्या उत्तराने काहीसे गोंधळतात व विचारतात
तू चित्रपट जास्त बघतो काय रे?डायलॉग जास्त मारतोस!!
नितीन 'नाही 'म्हणत मान डोलावतो.
सर पेपरचा आढावा घेतात.थोड्याच वेळात बेल होते.
सर्वांना हायसे वाटते. . .


क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६