शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग बारा:

 शेतकर्‍यांची पोरं : उत्तरार्ध भाग बारा:


सरकारी दवाखान्यात बानुगडेंना दाखल करतात.
" डाक्टर म्हातारं जगलं पायजेल" इनामदार अवसान आणून म्हणतात. डॉक्टर विचारतात ' ते' किरडू आणलंय काय? (धरुन किंवा मारुन)
सगळे चक्रावतात. एकजण म्हणतो.
" ती काय कुंबडी हाय व्हय धरायला"
डॉक्टर पुन्हा सांगतात " जर खरंच सर्पदंश असेल अनं साप कोणत्या जातीचा आहे हे कळलं तर उपचारांची योग्य दिशा ठरवता येते."
"तिथं आश्शील . . . जनावर हाय बघा ,केसं हायती त्याच्या अंगावर त्योच असंल" कोणतरी बोलतं

नित्या म्हणतो "ऐ तुमी बघितलंय का नक्की नाहीतर उगीच ते जनावर भांग पाडून (केस विंचरुन)आलं हुतं अन् चावलं म्हणून सांगु नका" साधारण सगळे हसतात.डॉक्टरही हसतात.
पण कुणाला काही सांगता येत नाही . डॉक्टर लगेच वॉर्डमधे निघतात.
इनामदार ज्येष्ठ म्हणून तिथेच थांबतात.बाकीचे लोक इतरत्र बारगळतात.
नित्या तिथेच उभा असतो. इनामदाराकडं बघत म्हणतो " "काका जगल का वं म्हातारं?"
इनामदार मिशावर उगीच हात फिरवत " शंभर टक्के जगनार "
लगेच इनामदारांचा एक खुशमस्कर्‍या म्हणतो
"मी तर म्हणतो जिथं जनावर चावलं तिथं जाऊन बघा जा ते जनावरंच कुठंतरी मरुन पडलं असंल, लय चिवाट म्हातारं"
त्यात मळीच्या रानाला लय जनावरं, बरं झालं ती रानं बानुगड्याला. . . . " तोवर
इनामदार त्याला हात करुन थांबवतात.
. . . . . . . .
बराच वेळ जातो.लोकांना आता 'कड' निभत नव्हता.
डॉक्टर पण काही सांगत नव्हते. अंधार पडला होता. सर्वांना निघायची घाई झाली होती.साहजिकच इनामदारांनाही जायचं होतं पण बोलणार कसं.
नितीनही तिथेच होता.बानुगड्याच्या घरचं असं कुणीच नव्हतं. सगळेजण घरी निघायचं म्हणून इनामदाराच्या भोवती कुजबुज करत जमतात. एक कुजबुज अशी असते की "थांबल त्यो त्योेच म्हणाला हिकडं आणा म्हणून "
नित्या काहीसं ऐकून स्वत:शीच हसतो. गाडीतून फिरायला मिळतंय म्हणून आलेल्या जनतेची त्याला कीव येते.
तो त्यांच्या घोळक्यात जातो.तोवर कुजबुज बंद होते.
" काका तुमी निघा मी थांबतो"
सगळ्या घोळक्याच्या भांड्यात जीव पडतो.
पण इनामदाराच्या कपाळावर 'आठी 'पडते.
गर्दीच्या मनात पाल चुकचुकते.
घसा खाकरत इनामदार घोळक्याला म्हणतो.
"तुम्ही सगळीच जावा गाडी घेऊन मी थांबतो म्हातार्‍याजवळ."
नितीनला इनामदाराचं बोलणं अनपेक्षित होतं.
इनामदाराला सोडून कसं जायचं म्हणून नाही होय करत सगळे निघू लागतात.
सगळेजण बसतात गाडी सुरु होताना एकजण विचारतो.
" ऐ पोरा आर छल की घरला"
नित्या मानेने नकार देत माघारी फिरतो.
इनामदार किंचीतसं गालात हसतात
संधी येताच नित्याला म्हणतात.
" पोरा लयंच धडाडी करतूस गड्या "
म्हातार्‍याच काय बरंवाईट झालं तर तुझ्यावर यील सम्द."
नितीन त्यांच्याकडे बघत (किंचीत तणावात)म्हणतो.
" काका निर्मळ मनानं केलेल्या गोष्टीत कधी अपयश येत नाही" म्हातार्‍याचा जीव वाचावा म्हणूनच ही ध डपड"
"देवळातबी जगलंच असतं की म्हातारं" इनामदार बोलतात.
यावर नितीन बोलणार तोच एक नर्स आवाज देते.
" बानुगडेंचे नातेवाईक आहेत का?"
दोघेही तिच्याकडं जातात.
"रात्री कोण थांबणार आहे.?"
"आम्ही" नितीन सांगतो.
नाईट ड्यूटीवरील नर्स येईपर्यंत काही औषधपाण्याच्या सूचना करुन ती निघून जाते.
नित्या बानुगड्यांच्या खाटेजवळ जातो.अर्धवट झोपलेल्या बानुगडेंना विचारतो.
" म्हातारं कसाय बर वाटतंय का?"
बानुगडे त्याच्याकडे बघून समाधानाने बोलतात.
"तू सदाचा पोरगा ना?"
नित्या होकारार्थी मान हलवतो.
तोवर इनामदारही आत येत बोलतात.
"बरा्य का? म्हातारं , म्हातारीची लय आठवण यत्या जणू? एवढ्यात निघायची घाई नका करूसा"
बानुगडें पुसंटस हसत म्हणतात.
"मळीची रान कसल्याबिगंर येऊ नका म्हणून सांगितलंय म्हातारीनं "
इनामदार यावर खळखळून हसतात.
काही दिवसांआधी हे दोघे एकमेकांचे पक्के वैरी होते यावर नित्याचाही विश्वास बसत नव्हता! !

क्रमशः

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६