शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध :भाग अकरा
शेतकर्यांची पोरं
उत्तरार्ध भाग अकरा:
दुसर्या दिवशी : कॉलेजमधे
" नाही रे पण मला खरंच वाटत नाही की केतन दादा ने ते नोटीस बोर्डवर लिहलं असेल म्हणून" रेणू सांगते.
यावर शंतनु म्हणतो "जाऊ दे मी मात्र मार खाता खाता वाचलो.
"तेच ना करुन गेला गाव अन् आलं दाढीवाल्यावर नाव"
नितीन बोलतो.
रेणू हसू लागते." याच्या म्हणी मात्र काहीही "
"शंतनु इज इक्वल टू दाढीवाला "म्हणत हसू लागते.
"पण मला कळत नाही केतन ने असं का बरं केलं असावं"
शंतनु विचारतो.
नितिन पुढं होऊन म्हणतो." शंत्या आरं त्यो भूषण्या हाय ना लय ट्यांव ट्यांव करत बर्मुड्यावर फिरत असतो, अन् स्पोर्टस ची लावलेली कोणतीही नोटीस फाडून टाकत असतो"
त्यात सायन्स व आर्टस् वाल्यांची खुन्नस असतिया दरवर्षी "
त्याचीच जिरवायची म्हणून लिहलं असेल त्यानं"
पण एवढ सगळं करुन आता मॅचेसला जाणं शक्य नाही होणार" असं शंतनु निराशेने सांगतो.
"क्काय? " ग्रेट" रेणू ( आनंदाने)
यावर नितीन उचकतो.
"मजी?" नितीन शंतनुला विचारतो.
अरे बाबांचा पारा पाहिलास ना काल? शंतनु.
नितीन आठवत म्हणतो. " काल.काल.काल."
"कालाय तस्मै नम:"
मॅचेसला खूप वेळ आहे तू आत्ताच नाट लावू नकोस.
तोपर्यंत बाबांचा राग कमी होईल.
रेणू मधेच थांबवते." तू गपरे त्या क्रिकेटनं काय पोट भरतं का?" नितीन .
तिच्याकडे कटाक्ष टाकत म्हणतो. " ताई हाच प्रश्न आपल्या केतन दादाला ही विचारु शकतेस ",
"हां
तसंही पोट नाही भरत . . . .
पण मन भरतं "
शंतनु त्याला हसत थांबवतो. ओठांचा चंबू करत.
म्हणतो. " बरोबर आहे तुझं, पण बाबा . . . "
"ऐकतील रे" नितीन बोलतो.
रेणू तोंड वाकडं करत नापसंती दर्शवते.
नितीन तिच्याकडं बघत म्हणतो.
" जाऊद्या ओ ताई"
रेणू किंचीत रागातच निघून जाते.
नितीन शंतनुकडे बघत म्हणतो.
" हे ययाती राजा जा आपल्या देवयानीची समजूत काढा, नाहीतर आपला 'चेंडूफळी यज्ञ' सफल होणार नाही"
शंतनु म्हणतो " आता हे ययाती व देवयानी कोण"
नितीन म्हणतो " तो ययाती राजा व देवयानी त्याची पत्नी"
शंतनु त्याच्याकडे बघत म्हणतो" तू सुधरणार नाहीस "
नितीन विषय थांबवत म्हणतो."व्हय रं पंता ते पद्माकर शिवलकर कोण रे??
शंतनु म्हणतो " मलाही नाही माहित असेल कोण तरी जुना क्रिकेटर" शंतनु पुढे बोलतो राहतो.
असो एकदाचं हे स्पोर्टस वीक संपलं पाहिजे लवकर म्हणजे अभ्यासात लक्ष लागेल. "
नितीन त्याला होकार दर्शवतो.दोघेही लेक्चरला जातात.
संध्याकाळ झाली. गुरं गोठ्यात.कोंबड्या खुराड्यात.माणसं घरात शिरु लागली. घराघरात सायंकाळच्या कोरड्यास,कालवणाचा घमघमाट सुटला होता.तशाच वातावरणात नित्या गावात पोहोचतो. त्याला अशी सायंकाळ खूप आवडायची. आपल्याच तंद्रीत घराकडे निघाला होता. तोवर.
" ऐ बानुगड्याला 'पान' लागलंय " म्हणत कुणीतरी धावत गेलं.'पान लागणं' म्हणजे काय हे लक्षात येईपर्यंत तो घरात शिरतो.
"काय रं कालवा सुरु हाय भाईर? आई विचारते.
नित्या ' "बानुगड्याला पान लागलंय"
"आरं देवा" म्हणत ती बाहेरच्या चौकटीत धावत येते.
आईची घालमेल बघून तो बोलतो.
"अगं हुईल बरं ,पान तर लागलंय" नितीन
"आरं बाळा पान लागलंय मजी किरडू चावलंय"
आई बोलते. तोवर नितीन बाहेर येतो.व त्या गोंगाटाच्या दिशेला धावतो. ते सगळेजण बहिरकुंडातल्या देवळाकडं धावत होते. नितीनला समजेना हे तिकडं का धावत आहेत. तो जागेवर पोहोचतो. जुन्या देवळाच्या आवारात मळकट गोधडीवर बानुगडे धापलत होता. कोण तरी लेंगेवाला मांत्रिक हळद कुंकू व काही दगड घेऊन मंत्र पुटपुटत होता. मधेच" आईराजा उधोउधो म्हणत हळदीने बानुगड्याचा मळवट भरत होता.
काहीजण उगीचच " वारं सोडा वारं सोडा म्हणत स्वत:च गर्दी करत उभे होते. नित्याला हा प्रकारच कळत नव्हता.
तिकडं बानुगडे हळूहळू डोळे मिटत होता. लोकांचा धीर सुटू लागला.तसं मांत्रिक लईच ओरडू लागला.
नित्या स्वगतच बोलू लागला." साप चावलाय तर देवळात कशाला आणलाय म्हातार्याला"
आणि हे आयघंल का वराडतंय म्हणत.नित्या बानुगड्यांच्या जवळ पोहोचतो. मांत्रिकाकडे बघत.
" ऐ बास करा थेरं " म्हणत बानुगड्या्ना उठवतो."
गर्दी संमिश्र कुजबुजु लागते.
"ऐ म्हातारं उठा . .ऊठा बघू दवाखान्यात चला" म्हनत त्याना उठवू लागतो.
तसं बानुगडे काहीसे जागे होतात.नित्याला हायसं वाटतं. "कुठं चावलंय"? विचारताच आण्णा पायाच्या आपल्या रबरबीत घोट्याकडे हात दाखवतात. नित्या काहीसा अंदाज घेऊन कमरेचा कटदोरा काढून पायाच्या वरती घट्ट बांधतो.
बानुगडे कळवळतो.
गर्दीत बघत बानुगड्यास उठवत म्हणतो." या की जरा धरु लागा "
तसं मांत्रिक ओरडतो. व बानुगड्यास थांबवूलागतो.
नित्या हिसका देतो.
" पोरा लय जोरा करु नगंस"
देवीचा कोप हुईल , मरुन जाईल , झडून जाईल."
यावर नित्या माघारी बघत.
"म्हातार्याचा जीवच जाऊदे तुझ्या लेंग्यातच साप सोडतो".
गर्दी खुदूखुदू लागते.काहींना नित्याचा आगावूपणा आवडत नाही.
बानुगड्यास तालुक्याला न्यायचं म्हटल्यावर गाडी लागणार , तोच चाणाक्ष नित्या इनामदाराच्या लोकांस म्हणतो ऐ "इनामदार काकांची गाडी बोलवा , म्हातारं तालुक्याला न्याव लागल."
ते लोक यंत्रवत ऐकतात. तोवर शक्य तितका रस्ता कमी करत नित्या देवळापासून बरंच अंतर लांब येतो.
तोवर " व्ह्यांग व्ह्यांग आवाज करत इनामदार चारचाकी घेऊन आपल्या पूर्वाश्रमीच्या दुश्मनास दवाखान्यात न्यायला येतो. क्षणभर सर्पदंश झाल्याच विसरुन बानुगडे आपसूक गाडीकडे झेपावतो . .
क्रमशः
छान, अंधविश्वास नसावा याचा प्रत्यक्षात दाखला दिला
ReplyDelete