शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध :भाग दहा
शेतकर्यांची पोरं उत्तरार्ध भाग :दहा
रेणू आपल्या अभ्यासात मग्न असताना केतन उगाच तिच्या पुस्तकांत डोकावतो. "काय रेणुमॅडम काय म्हणतंय तुमचं सायन्स कॉलेज " . रेणूला आपल्या भावाचा टोमणा समजून लगेच म्हणाली
"अभ्यास करा अन् भविष्य घडवा ,कलांच्या आहारी जाऊ नका." केतनही हसत हसत तिला उत्तरतो.
" होय आम्ही आहोत कलोपासक "
एखादा पेपर सोपा जावा म्हणून ज्या गणरायाला तू साकडं घालतेस ते गणराज चौसष्ट कलांचे अधिपती आहेत." त्यांचेच आम्ही कलोपासक भक्त आहोत.
बाकी तुझं सायन्स वगैरे सगळं थोतांड आहे थोतांड"
यावर रेणू भुवया ताणत तोंडाचा आ . . वासून म्हणते.
" क्काय थोतांड" ? रेणू ओरडतेच
"मग काय सांग बरं ?" केतन विचारतो.
रेणू कपाळावर आठ्या गोळा करत सांगायचा यत्न सुरु करते. " सायन्स मिन्स इट डील्स विथ द स्टडी ऑफ नॉलेज. . . . . ."
"राहुदे राहुदे हुषार पंडित " केतन तिला मधेच थांबवतो
तू सांग ना रे मग केतन पंडित"
केतन तिच्याकडे बघत. हातात असनारा चेंडू फिरवत बॉलिंग
टाकण्याची एक्शन करत बोलतो " सायन्स इज नथिंग एल्स ओन्ली " कॉमनसेन्स "
केतनच्या या उत्तरावर रेणू तोंड वाकडं करत
" काहीतरीच " म्हणत पुढं बोलत राहते
"नुस्तं क्रिकेट खेळा अन् मारामारी करा अभ्यासाच्या नावे बोंब "
केतन विचारतो कसली मारामारी?
रेणू त्याला सांगू लागते. " सायन्स कॉलेज- क्रिकेट टीम -शंतनु व नितीनची निवड- नोटीसबोर्डवर लिहलेला " नोटीस फाडली तरी चालेलचा मजकूर - शंतनुला फायनलच्या मुलांनी दिलेला त्रास."
यावर केतन ओठ दाबत हसू लागतो.
रेणू त्याला हसताना बघून विचारते.
" हसतोस काय, असं कुठं असतंय काय"
लिहलंय कुणी? अन् उगाच शंतनुला त्रास? "
तुला काय वाटतंय? कुणी लिहलंय ते? केतन विचारतो.
मला वाटतंय त्या नितीन नेच लिहलं असेल त्यालाच असल्या उचापती करायच्या असतात." रेणू वदते.
"असो पण त्यांनी शंतनुला त्रास नको होता द्यायला"
केतन बोलतो.
"म्हणजे? रेणू विचारते.
"अगं ते मीच लिहलं होतं "म्हणत हास्याची कारंजी फोडतो पुन्हा बॉलिंगची एक्शन करत घरातून बाहेर पडू लागतो.
रेणू विचारते" आरे पण का ? कशाला? नको ते धंदे."
केतन तसाच बॉलिंची रिवर्स एक्शन करत मागे येतो. तिच्याजवळ थांबतो. अन तिच्या डोक्यावर टपली मारत हळूच म्हणतो.
" असतय आपापलं सायन्स" म्हणून निघून जातो.
रेणू कपाळावर हात मारुन घेते. संपूर्ण प्रकरणाचा कळीचा नारद आपलाच भाऊ आहे हे ऐकून ती हैराण होते.तिला कधी एकदा शंतनुला सांगतेय असं झालं होतं.
* * *
सायंकाळच्या पावसाळी हवेतून येत. नित्या बिगी बिगी घरात शिरला. तोच बुरुडाची म्हातारी घरातून बाहेर पडली. आई चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली होती.
तव्यावर भाकरी व चुलीच्या वैलाकडं भात रटरटत होता.
हातपाय पुसंत नित्या आईशी गप्पा मारु लागतो. गारठलेला नितीन बघून आई त्याला
"बरं घे ती ताट वाटी बस लागलीच जेव" म्हणते.
त्यालाही सपाटून भूक लागलीच होती. पण तरीही आबांसोबत जेवतो असं म्हणतो.पण आई" गरम गरम खा" म्हणत ताटं वाढतेच.
काळ्या बुडाच्या भगुल्यातील उडीदाची आमटी व गरम भाकरी नित्या चुरुन(कुस्करुन) खाऊ लागतो. आई मनसोक्त जेवू घालते.. त्रृप्तीचा ढेकर देऊन तो उठतो. आईला समाधान वाटतं. नित्या पोटावरुन हात फिरवत बाहेर पडतो व शंतनुकडे जातो.
परब सरांना समोर बघताच थोडासा गोंधळतो. परब सर त्याला " या नितीनराव या " नितीन त्यांच्या "राव" शब्दामुळे सावध होतो. नक्कीच काहीतरी विषय असणार याची जाणीव होते.
" कसं चाल्लंय कॉलेज " बरं चाल्लंय ना क्रिकेट वगैरे"
आता मात्र नितीन गर्भगळीतच होतो.
परब सरांना नजर न देता उत्तरतो.
"हो मस्त चाल्लंय "
काय? कॉलेज की क्रिकेट? परब सरांचा आवाज वाढलेला असतो.
नितीन हळूच चोरटा कटाक्ष शंतनुच्या खोलीकडे टाकतो.
मनाशीच बोलत असतो" आयघा. . . " कुठं बसलंय"
परब सरांना नितीनच्या मनातलं जणू ऐकू जातं.
ते म्हणतात " शंतनु बाहेर ये बाळ नितीनराव आलेत"
शंतनु बाहेर येतो तिथेच भिंतीला लागुन उभा राहतो.
नितीन ला हायंस वाटतं.
काही वेळ शांतता . अचानक परब सर एक श्लोक उच्चारु लागतात." ॥शिवबा कशास्तव कसे जगले स्मरुया शिवसूर्यमार्ग विजयार्थ उठा धरुया ॥
त्यांच बोलणं सुरुच असतं.
नितीन शंतनुला डोळ्यानेच विचारतो. " काय झालं?
शंतनु हळूच हाताने सांगतो. " थांब "
परब सर सांगत असतात.
"मुलांनो आयुष्यात खेळ महत्वाचे आहेत पण ते अति झालं तर आयुष्याचा खेळ व्हायला वेळ लागत नाही."
नितीनला आता विषय समजू लागतो.
सर बोलतच असतात " ज्या क्रिकेटचे तुम्ही भोक्ते आहात त्या क्रिकेटमुळेच उत्तम कौशल्य असूनही दखल न घेतल्यामुळे अनेक पद्माकर शिवलकर आयुष्याशी झगडत विस्म्रुतीत जात असतात. . . "
"आपले आईवडील काय करतात कशासाठी करतात याची जाणीव ठेवा अन् तुमचे मार्ग तुम्ही ठरवा." असं म्हणत सर आतल्या खोलीत जातात.
नितीन सुटलो म्हणत दरवाजातून तिथूनच बाहेर पडतो.
घरात शिरतो तोच आईकडे जातो आई जेवत असते.
ताटात चटणी भाकरी असते. जेवताना तिच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झालेले असतात. सहज तो भांड्यांत डोकावतो. मघाशी जेवलो ती आमटी संपली होती. नितीन ला घरात शिरताना बुरुडाची म्हातारी जाताना पदराखाली वाटीतून काहीतरी नेत असल्याचं त्याला आठवलं. स्वता: पोटभर मिटक्या मारत जेवलेलो आठवलं. नंतर आबांसाठी म्हणून आईने नक्कीच सर्व आमटी त्यांना वाढली असणार . . हे जाणवलं. तरीही शांतपणे चटणीभाकरी खाणारी आई पाहून तो जास्तच खजील झाला . . .
त्याला परब सरांचे बोलणे ऐकू येऊ लागते.
"आपले आईवडील काय करतात कशासाठी करतात याची जाणीव ठेवा अन् तुमचे मार्ग तुम्ही ठरवा."
सुविकोळेकर
Comments
Post a Comment