गारेगार
गारेगार
. . .
साधारण १९८९ ते १९९२ चा काळ असावा. आताच्या काळासारखी संपन्नता होती अशी नाही किंवा नव्हतीही. त्यातच आमचा पहिली ते चौथीचा कालावधी असावा. बालवाडीचा वर्ग जोतिबाच्या देवळात (कुलकर्णी बाई) इतर वर्ग मारुतिच्या देवळात व नंतर काही दिवसांत "जीवन शिक्षण विद्यामंदीर "मराठी शाळेत. तशीही शिकायला कमी पण रानामाळात राबनार्या कष्टकऱ्यांना दिवसभर मुलं "पार्क" करायचे हक्काच ठिकाण. डब्यात भाकरीभाजी देऊन आयामाऊली रान जवळ करायच्या.डब्यात बहुधा अंडयाची पोळी (ऑम्लेट) असेल तर देवळातल्या वर्गात मांसाहारी( नॉनव्हेज) वाले (आयसोेलेट) केले जायचे. आम्ही कायम व्हरांड्यात आयसोलेशन मधे असायचो. साधारण दुसरीच्या वर्गात असू दुपारच्या सुट्टीत हुंदडायला (बोंबलत)शाळेबाहेर यायचो.बाजारपेठेच्या तळावर येऊन इनमिन तिन पानपट्यात डोकावायचो.आंबे विकनार्या एका आज्जींपाशी जाऊन उगाच आंब्याची लाल पिवळा बुलांग अशी स्तुती करायचो.लक्ष चुकवून आंबा उचलून पळायचो.अन् दुसर्या दिवशीही निरागस निर्लज्जपणे पुन्हा तिच्यापाशी पुन्हा जाऊन बसायचो. कहर म्हणजे आजी स्वता:हून एकेक आंबा हातावर टेकवायची." पोरानू मागून खावांव चुरी(चोरी) करायची न्हाय."
अशाप्रकारचा आणखी एक अनुभव. त्यावेळी सायकलवरुन फिरत फिरत एक 'गारेगार'वाला आमच्याइकडे यायचा. त्यावेळी गर्द तांबड्या रंगाचं ' गारेगार ' बघुन तोंडाल्या सुटलेल्या पाण्याचं तोंडातच बर्फ होऊन जायचं. त्याची चार आणे , पन्नास पैसे किंमत ही देणे शक्य नसायचं . मग हे गारेगारवाले काका भुईमुगाच्या शेंग्यांच्या बदल्यात (Barter system) गारेगार द्यायचे. पण शाळेत असताना शेंगा तरी कुठुन उपलब्ध होणार.
मग आमच्या अधीरमनाने एक दिवस एक शक्कल लढविली. एकदा एका कुणबिनीने तिथे शेंगाचं वाळवण घातलं होत. मी कोणताही मुलाहिजा न बाळगता शेंगांनी खाकी चड्डीचे खिसे भरुन(चोरुनच की) नेऊन त्यांना दिले.
त्यांनी लगेच एक रसरशीत लालबुंद गारेगार खाल्लेलं आजही आठवतंय. ओघळणारं गारेगार शर्टला पुसलं जायचं.
शर्टही लालपांढरा होऊन जायचा. एव्हाणा घरी सदर प्रकार कळायचा. कानउघाडणी व्हायची. पण लक्षात कोण घेतो. सदर गारेगारवाले इतर हंगामात ,चुरमुरे चणेफुटाणे विकायचे.पण धंदा बंद ठेवायचे नाही. कमालीचं सात.ते अजूनही पूर्वीप्रमाणेच पांढरा शर्ट व पांढरा लेंगा या पेहरावात सायकलवरुन त्यांचा निळ्या गारेगारचा कंटेनर सायकलच्या रबरी ट्युबने बांधलेला घेऊन यायचे. नंतर अलीकडच्या काळात तब्बेतीमुळे त्यांनी एक दुचाकी घेतली. वय नक्कीच साठीपार अाहे पण धंदा आजही सुरुच आहे. साधारण २००९ ला नोकरीमधे असताना एका शनिवारी असेच कुठेतरी रस्त्याला भेटले मी आवर्जुन थांबलो.बोललो. " आपसूक दोन गारेगारच्या कांड्या त्यांनी दिल्या " मी पैसे द्यायची घाई करताच म्हणाले "ऐ जहागिरदार माझ्या फुड्यात नागवा हिंडलास लहानाचा मोठ्ठा झालांस " ठिव ती चिल्लर " माझा मित्र या वाक्यावर खो खो हसत सुटला.
त्यांची नुकतीच भेट झाली. गप्पा झाल्या. "मस्त चाल्लंय." या वाक्यामागं अनेक प्रकारची दु:ख व विवंचना लपवल्या असाव्यात. आताही ते थंड मिल्क चोकोबार विकत असतात. अर्थात तेही घेतलेच. . . . .
"बराय" म्हणाले अन् ते निघाले सुख दुख:ची बॅलन्शीट सांभाळत.
"आनंदराव डेरवणकर" त्यांच्या
जुन्या अनेक आठवणींनी क्षणभर गारेगार झालो.
सुविकोळेकर . . .
Comments
Post a Comment